Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल -अजित पवार

 

पुणे : वृत्तसंस्था । पुढील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिला

 

पुणे शहर आणि जिल्ह्याबरोबरच बारामती तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली  आढावा बैठक पार पडली.

 

“सद्यस्थितीत बारामती तालुक्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल. ज्या ठिकाणी  रुग्ण जास्त आहेत, त्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करा. ते करताना नगरसेवकांना विश्वासात घ्या. ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यावर भर द्या, पुणे जिल्हा परिषदेनं ज्याप्रकारे अपडेटसाठी तयार केले आहे त्याच धर्तीवर बारामती तालुक्यासाठीही ॲप तयार करावे.  सद्यस्थिती आणि बेडची उपलब्धता याबाबत नागरिकांना माहिती मिळणं सुलभ होईल. अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करावं. जनजागृती करावी. ऑक्सिजन बेडची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. बारामती शहरात काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. यावर प्रशासनाने कडक उपाययोजना करुन दंडात्मक कारवाई करावी,” अशा सूचना अजित पवार यांनी बैठकीत दिल्या.

 

“सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणं आवश्यक आहे. लग्नसमारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी नियमानुसार लोकांची संख्या मर्यादित ठेवणं अपेक्षित आहे. याकडे विशेष लक्ष द्यावं लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा वापर करावा, कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्रीची चांगल्या प्रतीची खरेदी करावी. प्रशासनाने खबरदारी घ्यावी. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्यानं काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर ठेवणं, हात वारंवार धुणं, गर्दी टाळणं या त्रिसुत्रीवर भर देत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

Exit mobile version