Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना देवीची प्रतिष्ठापना; ४८ दिवस चालणार महायज्ञ !

 

चेन्नई : वृत्तसंस्था । तामिळनाडूमधील कोईम्बतूर जिल्ह्यामध्ये  आता आपल्या कोरोनापासून वाचवण्यासाठी देवच मदतीला येऊ शकतो असं येथील स्थानिकांना वाटत असल्याने शहराच्या बाहेर चक्क कोरोना देवीचं मंदिर उभारण्यात आलं आहे.

 

 

देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे.  दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत  आहे

 

कोरोना देवीचं मंदिर हे प्लेग मरियम्मन मंदिर स्थापन करताना जो विचार करण्यात आला होता त्याच विचाराने उभारण्यात आलं आहे. दिडशे वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीच्या वेळेस प्लेग मरियम्मन मंदिराची स्थापना करण्यात आली होती. शहराच्या बाहेरील इरुगुरमधील कामत्विपुरी अधीनम नावाच्या मठाने या मंदिराची स्थापना केलीय. या मंदिरात कोरोना देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. अधीनमच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवीची मूर्ती काळ्या खडकामधून साकारण्यात आली आहे. ही मूर्ती अडीच फूट उंचीची असून मठाच्या परिसरामधील मंदिरामध्येच तिची प्रतिष्ठापना कऱण्यात आलीय. रोज येथे अनेक भक्त  पुजा करण्यासाठी येतात.  या ठिकाणी ४८ दिवसांच्या महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

सध्या उभारण्यात आलेल्या कोरोना देवीच्या मंदिरामध्ये कोरोनामुळे केवळ पुजारी आणि मठातील अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येतो. या देवीच्या मंदिरामध्ये मर्यादित लोकांना जाण्यास परवानगी असली तरी येथे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे काटेकोरपणे पालन केलं जातं.

 

 

अशाप्रकारे यापूर्वीही येथे प्लेगच्या साथीच्या वेळेस मंदिराची स्थापना करुन त्याला प्लेग मरियम्मन मंदिर असं नाव देण्यात आलं होतं. प्लेगमुळे मरण पावणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर दीडशे वर्षांपूर्वी हे मंदिर उभारण्यात आलं आणि त्यात मरियम्मनची प्रतिमा ठेवण्यात आली होती. लोकांनी या देवाची आराधना सुरु केली आणि त्यानंतर काही कालावधीनंतर प्लेगच्या साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं येथील स्थानिकांनी त्यांच्या पूर्वजांकडून ऐकल्याचं सांगतातं.

Exit mobile version