Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना ठरू शकतो मुलांच्या पोटदुखीचं कारण

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काही कोरोना चाचणीच्या अहवालांमधून कोरोनामुळे मुलांच्या पोटावर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. कोरोना बाधित मुलांना आयसोलेशनमध्ये ठेवणं गरजेचं आहे.

 

पहिल्या लाटेमध्ये ५० ते ६० वयोगटातील व्यक्तींमध्ये धोका अधिक होता.  दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांना अधिक प्रमाणात या आजाराची लागण होत आहे. त्याचबरोबरीने लहान मुलांना देखील लागण होत असल्याचं वारंवार दिसून आलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आता तिसऱ्या लाटेबाबत अधिक चर्चा सुरू झाली आहे.

 

सध्याच्या परिस्थितीमध्ये लागण झालेल्या मुलांमध्ये वेगवेगळी लक्षणं आढळत आहेत. मुलांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनलची लक्षणं दिसून येत आहे. यामध्ये ताप, उलटी, सर्दी, कोरडा खोकला, भूक न लागणे अशी लक्षणं मुलांमध्ये दिसत आहेत. काही मुलांना श्वास घेण्यासाठी देखील अडथळा निर्माण होत आहे. मुलांची पोटदुखी आणि अतिसार तुम्हाला सामान्य वाटत असेल तर पालकांनो याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आपल्या मुलांची योग्य ती काळजी घ्या.

 

 

कोरोना होऊन गेल्यानंतरही काही मुलांमध्ये मल्टिसिस्टम इन्फ्लामेट्री सिंड्रोम आढळला यामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनलची लक्षणं दिसत आहेत. मुलांना भूक न लागणे, अतिसार, ताप, उलटी, डोकेदुखी, पोटदुखी, थकवा जाणवत असेल तर त्वरित ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.  पोटदुखी, अतिसार ही सामान्य लक्षणं असली तरी मुलांच्या पोटावर याचा अधिक परिणाम होत आहे.

 

मुलांमध्ये सौम्य लक्षणं आढळली तर तुम्ही घरच्या घरी त्यांच्यावर उपचार करू शकता. घरीच मुलांची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी सोयीस्कर ठरू शकेल. मुलं होम आयसोलेशनमध्ये असताना त्यांना सकस आहार द्या. त्यांना आराम करू द्या. मुलांना अधिक पाणी प्यायला सांगा. त्याचबरोबरीने प्रत्येक ६ तासांनी मुलांच्या शरीराचं तापमान तपासून पाहा. मात्र ताप अधिक वाढला असेल तर तुम्ही मुलांना पॅरासिटामॉल देऊ शकता. पॅरासिटामॉल देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

उलटी, अतिसार यांमुळे मुलांना अधिकाधिक थकवा जाणवू शकतो. मग अशावेळी मुलांच्या आहारामध्येही थोडे फार बदल केले पाहिजेत. मुलांना थकवा जाणवत असेल तर पाण्यामध्ये ओआरएस पावडर मिक्स करून त्याचं सेवन करायला सांगा. याव्यतिरिक्त नारळ पाणी, ताक तसेच इतर द्रव्यपदार्थ देखील तुम्ही मुलांना देऊ शकता. अतिसार, उलटी होत असताना शरीर डिहायड्रेट होऊ देऊ नका. पण मुलांमध्ये कोरोनाची अधिक लक्षणं तुम्हाला दिसत असतील किंवा मुलांना अधिक त्रास होत असेल तर लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रूग्णालयात भरती करा.

 

फोर्टीज रुग्णालयामधील बालरोग तज्ज्ञ पवन कुमार यांच म्हणणं आहे की, मुलांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमुळे कोरोनाची लागण होते. कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तिला लागण झाली आणि त्यानंतर त्या कुटुंबातील मुलाला अतिसार, पोटदुखी आणि ताप येत असेल तर त्याला देखील लागण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी मुलांची लगेचच चाचणी न करता डॉक्टरांचा आधी सल्ला घेणं फायदेशीर ठरू शकतं

 

डॉक्टर पवन यांच म्हणणं आहे की, मुलांना अतिसार, उलटीचा अधिक त्रास होत असेल तसेच मुलं पाणी पित नसतील, १२ तासांपेक्षा अधिक वेळ त्यांनी लघवी केली नसेल तर लगेचच त्यांना रूग्णालयात भरती करणं गरजेचं आहे.  मुलांना अतिसाराचा त्रास होत असेल तर त्यांची ऑक्सिजन पातळी तपासण्याची गरज नाही. ताप आणि अतिसारामुळे मुलांना होणारा त्रास योग्य ती काळजी घेतली तर लवकरात लवकर कमी होण्यास मदत मिळू शकते. अशावेळी मुलांना प्रोबायोटिक, ओआरएस किंवा पोटदुखीवरील औषध देण्याचा डॉक्टर पवन यांनी सल्ला दिला आहे. कोरोनामुळे मुलांना पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यांना अँटीबायोटिक देणं टाळा.

 

Exit mobile version