Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना ; झोपेतून जाग आल्यासारख्या मोदींच्या २ आठवड्यात २१ बैठक !

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एप्रिल महिन्यामध्ये   मागील दोन आठवड्यांपासून कोरोना परिस्थितीचा आढावा आणि इतर उपाययोजनांसाठी तब्बल २१ बैठकी घेतल्या आहेत.

 

देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झापाट्याने वाढत आहे . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काही दिवसांपासून दिवसाला साडेतीन लाखांहून अधिक रुग्ण देशात आढळून येत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये ऑक्सिजन बेड्स, औषधे आणि इतर आरोग्य व्यवस्थांचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर मोदींनी अनेक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला.

 

मार्च २०२० नंतर पंतप्रधानांनी पहिल्यांदाच कोरोनासंदर्भात एवढ्या मोठ्या संख्येने आढावा बैठकी घेतल्यात. मार्च २०२० मध्ये देशात पहिल्यांदा लॉकडाउन लागू करण्यात आला होता त्यावेळी मोदींनी सातत्याने अधिकाऱ्यांसोबत बैठकी घेतल्या होत्या. मार्च २०२० मध्ये मोदींनी कोरोनासंदर्भातील १४ बैठकी घेतल्या

 

केंद्र सरकारमधील अधिकारी, राज्याचे मुख्यमंत्री, इतर देशांचे बडे नेते अशा सर्वांसोबतच्या ऑनलाइन बैठकींचा या २१ बैठकींमध्ये समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतही मोदींनी फोनवरुन   परिस्थितीसंदर्भातील चर्चा केली होती. या दोन्ही नेत्यांनी भारताला शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

 

मार्च २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान मोदींनी करोनासंदर्भातील एकूण ६५ बैठकी घेतल्या आहेत. यासंदर्भातील माहिती केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने   दिली आहे. याशिवाय पंतप्रधान वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ, राजकीय नेते आणि यासंदर्भातील इतर महत्वाच्या व्यक्तींशी चर्चा करत असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना दिलीय. मात्र या चर्चांचा समावेश अधिकृत बैठकींमध्ये करण्यात आलेला नाही, असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

 

जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान भारतातील कोरोनाचा आलेख हा काही प्रमाणात स्थिरावला होता. या कालावधीमध्ये मोदींनी कोरोनासंदर्भातील बैठकी घेतल्या नाहीत. याच कालावधीमध्ये काही राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका असल्याने पंतप्रधान मोदींनी भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी अनेक सभा या कालावधीमध्ये घेतल्या. खास करुन पश्चिम बंगालमध्ये मोदींनी तृणमूल काँग्रेसविरुद्ध भाजपाचा प्रचार करताना मोठ्या सभा घेतल्याचं पहायला मिळालं. मार्च महिन्यात मोदींनी केवळ एकदाच कोरोनासंदर्भातील बैठक घेतली. १७ मार्च रोजी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती.

 

फेब्रुवारी महिन्यामध्येही मोदींनी कोरोनासंदर्भातील एकच बैठक घेतली होती. मोदींनी या साथीसंदर्भात, ‘कोव्हिड १९ व्यवस्थापन : अनुभव, योग्य कार्यपद्धती आणि पुढील नियोजन’ या विषयावर शेजराच्या दहा देशांसोबतच्या अधिकाऱ्यांसोबतची बैठक घेतली होती. जानेवारी महिन्यात मोदींनी कोरोनासंदर्भातील दोन बैठकी किंवा कार्यक्रमांना हजेरी लावल्याचं दिसून येतं. कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली त्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी आणि त्यानंतर वाराणसीमध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तींशी ऑनलाइन चर्चेत मोदी सहभागी झालेले.

 

सप्टेंबरमध्ये देशातील करोनाच्या पहिल्या लाटेने उच्चांक गाठल्यानंतर फेब्रुवारीच्या ११ तारखेच्या आठवड्यामध्ये दिवसाला सरासरी १० हजार ९८८ रुग्णांसहीत करोनाच्या रुग्णसंख्येने किमान पातळी गाठली होती. त्यानंतर मात्र पुन्हा करोनाची दुसरी लाट आहे. करोना रुग्णसंख्या वाढण्यासाठी प्रामुख्याने शिथिल केलेले निर्बंध, मोठ्या राजकीय तसेच धार्मिक सभा यांचा सामावेश होता. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून देशभरामध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. त्यामुळेच मागील १० दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑक्सिनजसंदर्भात पाच बैठकी घेतल्यात.

Exit mobile version