Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जळगावमधील १४ निवारागृहात राहताय १३५२ स्थलांतरीत मजूर !

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरांना काम नसल्याने ते आपापल्या गावी परतण्यास प्राधान्य देत आहेत. जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर देखील पोलीसांनी हजारो नागरिकांवर कारवाई करून त्यांना जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या शासकीय निवाऱ्यांमध्ये ठेवले आहे. यानुसार १४ निवारागृहात १३५२ स्थलांतरीत राहताय.

या निवारागृहात नागरीकांना आवश्यक त्या सोयीसुविधा प्रशासन उपलब्ध करुन देत आहे. या निवारागृहात राहत असलेला उत्तर प्रदेश येथील विकास यादव येथील सुविधांवर समाधान व्यक्त करताना म्हणाला की, आमच्या घरी जशी काळजी घेतली जाते. त्याहीपेक्षा अधिक चांगली काळजी आमची जळगाव जिल्हा प्रशासन घेत आहे. त्याबद्दल आम्ही जळगाव जिल्हा प्रशासनाचे धन्यवाद मानतो.  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्थलांरित नागरीक, मजूर यांना राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्याच्या सीमेला लागून गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमा असल्याने या जिल्ह्यातून अनेक नागरीक पायी जाताना दिसत आहे. या नागरीकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने 8 तर कामगार विभागाने 6 असे एकूण 14 निवारागृह उभारले आहे. या निवारागृहामध्ये आतापर्यंत 1 हजार 352 नागरीक, मजूरांना ठेवण्यात आले आहे. यातील अनेक मजूर हे परप्रांतीय असून ते पुणे, मुंबई वरुन आपल्या गावाकडे निघाले असतांना पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन याठिकाणी ठेवण्यात आले व त्यांना पूर्ण सोयी सुविधा प्रशासन पुरवत आहे.
मोलमजुरी करून गुजराण करणारे हे मजूर राजस्थान, उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेशातील आहेत. त्यांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार व जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितले.

स्थलांतरीत नागरीक व मजुरांसाठी जिल्हा प्रशासनाने जळगाव शहरात राधाकृष्ण मंगल कार्यालय, लाडवंजारी मंगल कार्यालय व गेंदालाल मिल गोडावून या तीन ठिकाणी तसेच तरवाडे, ता. पारोळा, कार्की फाटा, आरटीओ चेकपोस्ट हॉल, मुक्ताईनगर, खडकदेवळा बु. ता. पाचोरा, के. आर. कोटकर महाविद्यालय, चाळीसगाव, बोथरा मंगल कार्यालय, चोपडा या ठिकाणी निवारागृह सुरु केले आहे. तर कामगार विभागानेही, भुसवाळ, चोपडा आदि 6 ठिकाणी कामगारांसाठी निवारागृह सुरु केले आहे. शासकीय निवारागृहात 441 तर कामगार विभागाच्या निवारागृहात 911 असे एकूण 1352 स्थलांतरीतांची सोय जिल्ह्यात करण्यात आली आहे. जळगाव शहरातील तीन निवारागृहामध्ये मध्यप्रदेशातील 111, उत्तरप्रदेशातील 74, राजस्थानातील 146 तर महाराष्ट्रातील 110 मजूरांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, मॅरेज हॉल बेघर, रस्त्यावर फिरणाऱ्यांसाठी ताब्यात घेण्याच्या सूचना प्रांताधिकारी, तहसीलदारांना केलेल्या आहेत. त्यानुसार त्या त्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी आवश्यकतेनुसार निवारागृह सुरु केले आहे. जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे यांनी राधाकृष्ण मंगल कार्यालय, लाडवंजारी मंगल कार्यालय अधिग्रहीत केली आहे. तसेच अनेक सेवाभावी संस्था व लोकप्रतिनिधींच्या मदतीने त्यांच्या निवाऱ्याची, भोजनाची व इतर वस्तू देण्याची सोय केली. मंडलाधिकारी योगेश नन्नवरे, मेहरुणचे तलाठी सचिन माळी, शहर तलाठी रमेश वंजारी हे मंगल कार्यालयात थांबून या सर्व स्थलांतरित मजुरांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवत आहे. या नागरीकांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. येथे भरती करतांना त्यांना ताप, खोकला, सर्दी अशी काही लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही यासाठी प्रशासन दक्ष आहे. त्यांचे समुपदेशनही करण्यात येणार आहे.

या निवाऱ्यामध्ये वास्तव्य करणारा उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील बबलू पांडे हा 32 वर्षीय तरुण येथे मिळणाऱ्या सोयी सुविधांवर समाधान व्यक्त करताना म्हणाला की आम्ही गेली 3/4 दिवसांपासून येथे वास्तव्यास आहोत. आम्हाला आल्यापासून कोणत्याही पद्धतीची अडचण निर्माण झाली नाही. प्रशासन आमच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण करत आहे. घरात असताना जशी आपली काळजी घेतली जाते तशीच काळजी येथे घेतली जात आहे. आम्हाला येथे कशाचीही कमतरता पडत नसून आम्ही येथे आनंदी असल्याचे ही सुरज कुमार म्हणाले.

Exit mobile version