Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : चिंता वाढवणारे देशातील ३५ पैकी १७ जिल्हे महाराष्ट्रातील

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४२ लाखांच्या पलिकडे गेली आहे. सर्वात जास्त रुग्णसंख्या असलेल्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीही देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अशीच आहे. महाराष्ट्रासह पाच राज्यांमधील ३५ जिल्ह्यात रुग्ण आणि मृत्यूदर अधिक असल्याचं समोर आलं आहे. या ३५ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचा समावेश आहे.

देशाच्या ३५ जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा नुकताच घेण्यात आला. प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय करण्याबरोबरच बाधितांचा शोध घेताना अन्य आजार असलेले रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना संबंधित राज्यांना देण्यात आल्या.

पहिल्या टप्प्यातील रुग्णनिदान करण्यासाठी आणि संसर्ग साखळी तोडण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आणि ‘आरटी-पीसीआर’ चाचण्या करण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.

संबंधित ३५ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि अन्य यंत्रणांनी करोना साथ नियंत्रणाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या योजना आखाव्यात किंवा असलेल्या योजना अद्यावत कराव्यात, असे निर्देशही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.
.
रुग्णवाढ आणि मृत्यूदर अधिक असलेल्या ३५ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा, पालघर, औरंगाबाद, धुळे आणि नांदेडचा समावेश आहे.
प्रतिबंधात्मक उपाय, रुग्णसंपर्क शोध, संशयित रुग्णांवर लक्ष, मृत्यूचे प्रमाण, साप्ताहिक रुग्णवाढ, आरटी-पीसीआर चाचणी, जलद प्रतिजन चाचण्या, रुग्णांलयातील खाटांची स्थिती, अतिदक्षता विभागातील खाटांची सद्य: स्थिती, तेथील आरोग्य सुविधा, कृत्रिम श्वसन यंत्रणा इत्यादी माहितीचा समावेश असलेला अहवालही बैठकीत सादर करण्यात आला होता. .देशात २४ तासांत ७३ हजार ६४२ रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्तांचे प्रमाण ७७.३२ वर पोहोचले आहे, तर मृत्यूचा दर १.७२ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. देशात आतापर्यंत ३२ लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात आठ लाख ६२ हजार ३२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या २०.९६ टक्के आहे. सलग दोन दिवस बरे होणाऱ्यांची संख्या ७० हजारांहून अधिक नोंदवण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येत दिवसाला २० हजारांच्या जवळपास वाढ होताना दिसत आहे. रविवारी यात आतापर्यंतची उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली. राज्यात २३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण एका दिवसात आढळून आले असून, लॉकडाउन शिथिल केल्यानंतर संसर्ग वाढत असल्याचंच यातून दिसून येत आहे.

Exit mobile version