Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवणे योग्य नाही – जिल्हाधिकारी

जळगाव, प्रतिनिधी । डॉक्टर रुग्णांना सेवा देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात, त्यामुळेच समाजानेही डॉक्टरांना देवदूताची उपमा दिलेली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवल्यास अत्यावस्थ रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होतील याची जाणीव ठेवून खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. याबाबत जिल्हास्तरावर सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे यांचेसह सर्व अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ ढाकणे पुढे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणासाठी नागरीक व खाजगी वाहने रस्त्यावर येणार नाही, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यास अडथळा होणार नाही, याची काळजी पोलीस विभागाने घ्यावी. लॉकडाऊनच्या काळात जे खाजगी डॉक्टर आपले दवाखाने बंद ठेवून रुग्णांची गैरसोय करतील. त्यांच्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनला अहवाल पाठविण्यात येईल. जिल्ह्यात कुठेही औषधांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. आवश्यकता भासल्यास आरोग्य विभागाने तातडीने औषधांची खरेदी करावी. जीवनाश्यक वस्तुंचा सध्याजरी तुटवडा नसल्या तरी भविष्यातही होवू नये यासाठी आवश्यक ते नियेाजन पुरवठा विभागाने करावे. फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी एकाच ठिकाणी विक्रीस न बसता हातगाडीवर चौकाचौकात व कॉलनीमध्ये जाऊन विक्री करावी. जेणेकरुन खरेदीसाठी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणाऱ्या वाहनांना परिवहन विभागाने तर अत्यावश्यक सेवेचे पासेस तहसीदार यांनी द्यावे. आपतकालीन परिस्थती उद्भवल्यास तातडीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यात किमान 500 बेड आवश्यक त्या सोयीसुविधांसह तयार ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी महसुल व सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्यात. त्याचबरोबर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालये लॉकडाऊनच्या काळात बंद राहणार नाही याची सर्व संबधितांनी काळजी घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला दिल्यात.

Exit mobile version