Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना; आयुर्वेदिक औषधांच्या परिणामाचा अभ्यास सुरू

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । कोरोनाचा उपचार आयुर्वेदाने करण्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने तिखट प्रश्न विचारून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना घेरल्यानंतर यावर आयुर्वेदिक औषधांचा काय परिणाम होतो याचा वैज्ञानिक अभ्यास सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आयुर्वेदिक उपचाराने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किती उपयोग होतो याबाबत वैज्ञानिक निष्कर्ष निघालेले नसताना तसे दावे का केले जात आहेत, असा प्रश्न आरोग्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता.

आयुर्वेदिक औषधे घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचे उत्तर डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले होते. हे उपचार पू्र्ण साहित्याचा अभ्यास करून सुरू करण्यात आले. यात इन-सिलिको स्टडी, एक्सपेरिमेंटल स्टडी आणि क्लिनिकल स्टडी सारखे वैज्ञानिक अभ्यास केले गेले असल्याचे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

आरोग्य मंत्रालयाने आरोग्य संवर्धन आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुराव्यांच्या आधारे आयुष उपचारांना प्रोत्साहन दिले आहे. यात गुडूची, अश्वगंधा, गुडूची आणि पीपली, तसेच आयुष ६४ सारख्या औषधांचा समावेश आहे.

याबाबत अभ्यास करण्यात आला असून या औषधांची इम्यूनिटी मॉड्यूलेरिटी, अँटी व्हायरल, अँटी पायरेटिक, अँटी इन्फ्लेमेट्री प्रॉपर्टी असल्याचे या अभ्यासाअंती सिद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. इंटर डिसिप्लिनरी टास्क फोर्सच्या शिफारशीवर वैज्ञानिक अभ्यासाची सुरुवात झाली आहे. रुग्णांच्या व्यवस्थापनांमध्ये या औषधांचा किती परिणाम होतो याचा अभ्यास केला जाणार आहे.

बुधवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना प्रश्न विचारून घेरले होते. आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करण्यापूर्वी त्या औषधांचे वैज्ञानिक संशोधन केल्याचे पुरावे देण्यात यावेत, अशी मागणी आयएमएने केली होती.

Exit mobile version