Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना अमरच ! ; लशींना जुमानणारा नाही !!

लंडन: वृत्तसंस्था । जगभरात कोरोनावरील १५० लशींवर संशोधन सुरू आहे. दुसरीकडे तज्ज्ञांनी मोठे भाष्य केले आहे. लस विकसित झाली तरी संसर्ग थांबणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तज्ज्ञांच्या या विधानामुळे लशीची प्रतिक्षा करणाऱ्यांना धक्का बसला आहे.

ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रीक वॉलेस यांनी सांगितले की कोरोना संसर्ग लशीद्वारे रोखता येऊ शकत नाही. लस पुढील वर्षी मार्च महिन्याआधी उपलब्ध होईल याची शाश्वती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लशीद्वारे आतापर्यंत फक्त कांजण्याच्या आजारावर नियंत्रण मिळवता आले आहे.

वॉलेस यांनी सांगितले की, या विषाणूचा उपचार हा एखाद्या ऋतुबदलामुळे येणाऱ्या तापासारखा होऊ शकतो. लशीवरील संशोधन पूर्वीपेक्षा अधिक चांगले झाले आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर लोकांना लस उपलब्ध होईल अशी लस उपलब्ध होणे सध्या तरी कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. संसर्गाला पूर्णपणे रोखले जाईल, अशी लस उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे सर पॅट्रीक यांनी ब्रिटनच्या संसदीय समितीला सांगितले.

पॅट्रीक यांनी सांगितले की, आजार फैलावत राहणार आणि काही ठिकाणी हा आजार अतिशय सामान्य होणार आहे. लशीकरण मोहिमेमुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी होणार असून आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लशीकरणामुळे कीरोना आजार हा सामान्य आजार होणार आहे. येत्या काही महिन्यातच लस कितपत आणि किती दिवसांपर्यंत प्रभावी ठरेल हे समजणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर पॅट्रीक यांनी सांगितले की, सध्या चाचणी सुरू असलेल्या लशींनी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण केली आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतरच ही लस कितपत संसर्ग रोखू शकते याची माहिती उपलब्ध होईल, लस कितपत सुरक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणावर लस कशी देता येईल हेदेखील माहिती होणार असल्याचे व पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत लस सामान्य नागरिकांपर्यंत पोहचणे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version