Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना अजून संपलेला नाही, तो रंग बदलतोय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशातील डॉक्टरांची शिखर संघटना  All India Institute of Medical Science चे अध्यक्ष डॉ. नवनीत विग यांनी “करोना अजून संपलेला नाही, तो वारंवार आपला रंग बदलतो आहे. आपण सतर्क राहायला हवं” असा इशारा दिला आहे 

 

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अनलॉकची प्रक्रिया अनेक राज्यांनी सुरू केली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुन्हा एकदा घराबाहेर पडताना नियमांना तिलांजली दिल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून गर्दी केली जात असून मास्कचा देखील वापर करण्याचा मूलभूत नियम पाळला जात नसल्याचं दिसून येत आहे.

 

 

 

लाट ओसरू लागल्यानंतर देशात अनेक ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र देखील अनेक ठिकाणी दिसत असून यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यावर बोलताना डॉ. विग म्हणाले, “कोरोना देशातून अजून संपलेला नाही. तो सातत्याने आपले रंग बदलत आहे. त्यामुळे आपण स्मार्ट आणि सतर्क राहायला हवं. लोकांनी स्वच्छ मास्क घालायला हवेत. लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं

यावेळी डॉक्टर नवनीत विग यांनी  परिस्थितीविषयी सवाल उपस्थित केला आहे. “ तिसरी लाट आली, तर आपण कुणाला दोषी धरणार आहोत? आपल्याला प्रत्येक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याच्या दृष्टीने आपलं धोरण आणि प्रयत्न करायला हवेत. शिवाय, प्रत्येक जिल्ह्यात किमान ५० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे असायला हवेत”, असं ते म्हणाले.

 

महाराष्ट्रात देखील टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी देखील कमी आहे, अशा ठिकाणी निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र, अशा ठिकाणी लोकांनी पुन्हा बाजारपेठांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भिती व्यक्त केली आहे. “गर्दीची भिती नाही. ज्या पद्धतीने मास्कशिवाय लोक गर्दी करतायत, त्यांची मला जास्त भिती वाटते. त्यामुळे तिसरी लाट अजून लवकर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने  नियम पाळायला हवेत”, अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

 

Exit mobile version