Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनामृतांच्या अंत्यसंस्कारासाठी ७० हजारांची मागणी !

 

हैदराबाद : वृत्तसंस्था ।  हैदराबादमध्ये कोरोनाबाधित मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल ७० हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून कमी झाली असली तरी मरण पावणाऱ्यांचं प्रमाण चिंता वाढवणारं आहे. त्यातच कोरोनामुळे मरण पावणाऱ्या व्यक्तींचे मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात येत नसल्याने मरण पावलेल्या व्यक्तीला अखेरचा निरोप देणंही अनेकांना कठीण झालं आहे. देशभरामध्ये भीतीचं वातवरण असतानाच दुसरीकडे या संकटाच्या काळामध्येही काहीजण आर्थिक फायदा बघत आहेत.

 

हैदराबादमधील एका महिलेने तिच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी ५० हजार रुपये दिल्याचं म्हटलं आहे. एवढे पैसे घेऊनही या व्यक्तींवर कुठे आणि कसे अंत्यस्कार करण्यात आले याची माहिती देण्यात आलेली नाही. या महिलेच्या पतीवर गांधी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पतीचा मृत्यू झाल्यानंतर मी त्यांच्या अंत्यविधीसाठी ५० हजार रुपये रोख रक्कम दिल्याचं ही महिला सांगते. हे पैसे रोख पद्धतीनेच घेतले जातात आणि त्याची कोणतीही पावती दिली जात नाही. २५ ते ७० हजारांदरम्यान अंत्यस्कारासाठी पैसे मागीतले जात आहेत.

 

अन्य एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या वडिलांचा सरकारी रुग्णालयामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्याच्याकडे ७० हजारांची मागणी करण्यात आली. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी २५ हजार रुपये घेण्यात आल्याचे प्रकार घडल्याचं मान्य केलं आहे. मात्र आता सरकारने  कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी खासगी रुग्णालयांना जास्तीत जास्त आठ हजार घेता येतील असं निर्शिचत केलं आहे. एखाद्या व्यक्तीचं सरकारी रुग्णालयामध्ये कोरोना उपचारांदरम्यान निधन झालं किंवा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यास त्यावर मोफत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

एका स्वयंसेवी संस्थेशीसंबंधित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार पैसे नसल्याने अनेकांना आपल्या नातेवाईकांवर अंत्यस्कार करता येत नाहीय. त्यामुळेच अनेक रुग्णालयांमध्ये मृतदेह पडून आहेत. या व्यक्तीने आमच्या संस्थेने आतापर्यंत १८० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचं सांगितलं.

 

Exit mobile version