Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाने जगात गरिबांची संख्या ३.७ कोटींनी वाढवली

नवी दिल्ली वृत्तसंस्था । गेल्या काही वर्षातील वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली असली तरी कोरोना व्हायरसमुळे जगभरातील ३.७ कोटी लोक अधिक गरीब झाले आहेत. बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने त्याच्या रिपोर्टमध्ये ही बाब स्पष्ट केली आहे. कोरोनामुळे आर्थिक पातळीवर प्रत्येक देशात मोठ्या प्रमाणात संकट निर्माण केल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजाचा हवाला देत या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी १८ हजार अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केल्यानंतर देखील २०२१ च्या अखेरपर्यंत जागतिक अर्थव्यवस्था १२ हजार अब्ज डॉलर पेक्षा फार पुढे जाणार नाही. या फाउंडेशनच्या गोलकीपर्स रिपोर्टमध्ये जगातील गरीबी कमी करण्यासाठी आरोग्य संदर्भातील मुद्द्यांवर चर्चा केली जाते.

कोरोना व्हायरसच्या काळात भारतात २० कोटी महिलांना रोख रक्कम दिली गेली. यामुळे भूख आणि गरीबीवर काही प्रमाणात मात करता आली. महिला सबलीकरणाला प्रोत्साहन मिळाले. बिल गेट्स यांनी भारतातील आधार कार्डवरील पैसे वर्ग करण्याच्या यंत्रणेचे कौतुक केले. ही प्रक्रिया सर्वात उत्तम आहे आणि भारताने ज्या मोठ्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी केली आहे ती अन्य कोणत्याही देशाने केली नाही.

Exit mobile version