Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनातून बरे झालेल्यांच्या अन्य तक्रारी वाढल्या !

 

मुंबई  : वृत्तसंस्था । कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या अलीकडच्या काळात पोटदुखी, रक्तातील साखर वाढणे, केस गळणे, अंगदुखी ,  म्युकरमायकोसिस , हृदयविकाराच्या समस्येमध्ये वाढ झाल्याचे आता डॉक्टर मान्य करीत आहेत

 

कोरोना संसर्गाचे प्रमाण मुंबईमध्ये कमी होत असले तरीही कोरोनापश्चात तक्रारींसाठी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढते आहे. या रुग्णांना  संसर्गातून पूर्णपणे बरे होण्यासाठी लागणारा कालावधी हा वीस ते पंचेचाळीस दिवसांचा असल्याचे वैद्यकीय निरीक्षण व्यक्त केले जात आहे.

 

पोटदुखी, रक्तातील साखर वाढणे, केस गळणे, अंगदुखी तसेच म्युकरमायकोसिसच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांना कोरोनापश्चात टप्प्यामध्ये त्वरित उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्न केले जातात. व्हिटॅमिन ई चे सेवन, पोषक आहार आणि झेपेल इतका व्यायाम केल्यामुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते, असे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. एस. मोहिते यांनी सांगितले. तर हृदयविकाराच्या समस्येमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे.

 

डॉ. जयदीप शिंदे यांनी, कोरोनामुक्त व्यक्तीमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले. रुग्णाने ग्लिकोझिलेटेड हिमोग्लोबिन चाचणी केल्यास मधुमेह नसल्याचे निष्पन्न अनेकदा होते. त्यामुळे संसर्ग होऊन गेल्यानंतर साखरेचे रक्तातील प्रमाण वाढले तर घाबरून जाऊ नये. कोरोना उपचारात अनेकदा स्टिरॉइड देण्यात येतात, त्यामुळेही साखर वाढते. जेव्हा रक्तातील शर्करा पातळीत वाढ होते तेव्हा कोरोना विषाणू स्वादूपिंडातील बीटा पेशीला चिकटून बसतो, असे पाहणीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इन्सुलिन प्रवाहाला अटकाव होतो. ज्यामुळे शरीरात उर्जेचा स्रोत म्हणून काम करणाऱ्या ग्लुकोजचे रक्तातील प्रमाण वाढते. यापू्र्वी डायबिटीज असलेल्या रुग्णामध्ये दडून असलेल्या प्रकाराला फ्रँक डायबेटीस मेलिटस पोस्ट कोविड इन्फेक्शन म्हणून ओळखले जाते.

 

डॉ. गायत्री घाणेकर यांनी, ज्या रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आहे, त्यांनी ग्लिकोझिलेटेड एचबी (एचबी ए १सी) तपासून घ्यावे. शरीरावरील ताण हलका करून, पचायला हलक्या आहाराचे सेवन करून तसेच जीवनशैलीत सुधारणा केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करायला मदत होते, असे सांगितले.

 

Exit mobile version