कोरोनाच्या स्ट्रेनचं जागतिक आरोग्य संघटनेकडून नामकरण

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । जागतिक आरोग्य संघटनेकडून भारतात आढळून आलेल्या कोरोनाच्या दोन स्ट्रेनला  डेल्टा आणि कप्पा अशी नावं देण्यात आली आहेत.

 

जगभरात कोरोनाचे वेगवेगळे स्ट्रेन निर्माण झाले आहे. करोनाच्या विषाणूमध्ये बदल झाल्याने हे स्ट्रेन निर्माण झाले असून, त्याच्या नावांवरून गोंधळ निर्माण झाला असून, वादही होताना दिसत आहे. या सगळ्या गोंधळावर जागतिक आरोग्य संघटनेनं मार्ग काढला असून, विविध देशात आढळून आलेल्या स्ट्रेनचं नामकरण केलं आहे. या स्ट्रेनला नाव देताना ग्रीक वर्णमालेचा आधार घेण्यात आलेला आहे.

 

नवीन स्ट्रेन निर्माण झाल्यानंतर त्यांच्या नावावरून वाद सुरू झाले होते. डबल म्युटेंशन असलेल्या B.1.617.2 स्ट्रेनचा भारतीय स्ट्रेन असा उल्लेख काढण्याचे आदेश केंद्र सरकारने सोशल मीडियाला दिले होते. सिंगापूर सरकारनंही सिंगापूरमध्ये आढळून आलेलं नवीन म्युटेशन भारतातीलच असल्याचं म्हटलं होतं. या सगळ्या वादावर मार्ग काढत जागतिक आरोग्य संघटनेनं विविध देशात आढळून आलेल्या स्ट्रेनला नाव दिली आहेत.

 

भारतात दोन स्ट्रेन आढळून आलेल आहेत. त्या दोन्ही स्ट्रेनचंही नाव बदलण्यात आलं आहे. ग्रीक वर्णमालेचा वापर करून आरोग्य संघटनेनं ही नाव निश्चित केली आहेत. यात ऑक्टोबर २०२०मध्ये भारतात आढळून आलेल्या B.1.617.2 या स्ट्रेनला डेल्टा असं नाव देण्यात आलं आहे. मागच्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा आढळून आलेल्या B.1.617.1 या स्ट्रेनला कप्पा असं नाव देण्यात आलं आहे.

 

ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, अमेरिका, भारत या देशात म्युटेशन होऊन नवीन स्ट्रेन निर्माण झाले आहेत. या स्ट्रेनचा उल्लेख या देशांच्या नावानेच केला जात होता. ब्रिटनमध्ये सप्टेंबर २०२० मध्ये आढळून आलेल्या B.1.1.7या स्ट्रेनचं नाव अल्फा असं ठेवण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेत B.1.351 स्ट्रेन आढळून आला होता. तो आता बेटा या नावाने ओळखला जाणार आहे. ब्राझीलमध्ये जानेवारीमध्ये आढळून आलेल्या स्ट्रेनला गामा असं नाव देण्यात आलं आहे. अमेरिकेतील स्ट्रेनला एप्सिलॉन, तर फिलीपाईन्समध्ये जानेवारी महिन्यात आढळून आलेल्या स्ट्रेनचं नाव थीटा असं ठेवण्यात आलं आहे.

 

Protected Content