Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाच्या प्रतिकारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : ना. गुलाबराव पाटील यांनी दिली माहिती

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा प्रतिकार करण्यासाठी प्रशासनातर्फे तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या असून याच्या अंतर्गत सुमारे चार कोटी रूपयांची सामग्री तात्काळ खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती आज पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

याबाबत वृत्त असे की, कोरोनाचा यशस्वी प्रतिकार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. यातच मेहरूण येथे एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्‍वभूमिवर, ना. गुलाबराव पाटील यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा रूग्ण आढळला असला तरी तो बाहेरून आलेला होता. यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. कारण प्रशासन या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आधीपासूनच सज्ज असून आता तातडीने नवीन सामग्री खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हील सर्जन-जिल्हा रूग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासाठी विविध सामग्रीचा समावेश करण्यात आलेला आहे. यात वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रौढ व बालकांसाठी इनव्हेसीव आणि नॉन इनव्हेसीव या दोन्ही प्रकारातील व्हेंटीलेटर्ससह अन्य सामग्री खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये फेस मास्क, सॅनिटायझर, हातमोजे आदींसह अन्य सामग्रीचा समावेश आहे. ही सामग्री सुमारे २.४४ कोटी रूपयांचा आहे. तर जिल्हा रूग्णालयाचे सिव्हील सर्जन यांच्यासाठी एकूण ७४.८७ लाख रूपयांची खरेदी करण्यात येणार आहे. यात उशी व गाद्यांसह बेड, पीईपी किट, सॅनिटायझर आदींसह अन्य सामग्रीचा समावेश आहे.

दरम्यान, ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांसाठी सुमारे ५९.५६ लाख रूपयांची सामग्री खरेदी करण्यात येणार आहे. याच्या मध्ये अल्कोहोलयुक्त सर्जीकल हँड सोल्युशन, ट्रिपल लेअर फेस मास्क, थर्मामीटर स्कॅनर आदींसह अन्य औषधींचा समावेश आहे. या तिन्ही विभागांसाठी तातडीच्या उपाययोजना म्हणून या खरेदीला प्रशासनाने मान्यता दिली असून येत्या एक-दोन दिवसात जिल्ह्यातील जनतेसाठी ही सामग्री उपलब्ध होणार आहे. कोरोना विषाणूचा आपल्या सर्वांनी यशस्वीपणे प्रतिकार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपण एकत्रीतपणे लढा देणार आहोत. यासाठी प्रशासन तर सज्ज आहेच पण याला यशस्वी करण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. यामुळे आपण कोरोनाचा यशस्वी सामना करू असा नक्कीच विश्‍वास वाटतो असे ना. पाटील यांनी या निवेदनात नमूद केले आहे.

Exit mobile version