Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीजग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील वाढत्या कोरोनामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम झाला असून, वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी बिलांचा भरणा करताना धनादेशाऐवजी ऑनलाइन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

गेल्या जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महावितरणने वीजमीटरचे रीडिंग व बिलांचे वाटप तसेच वीजबिल भरणा केंद्र सुरू केले आहे. जूनमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांच्या अचूक वीज वापराचे मीटर रीडिंगप्रमाणे वीजबिल देण्यात आले आहे. त्याबाबतचा संभ्रम दूर होऊन आता वीजबिल भरण्यास वेग आला आहे. ग्राहकांनी धनादेशाद्वारे वीजबिलांचा भरणा केला असेल तर नियमानुसार ज्या दिवशी धनादेश वटवला जाईल त्याच दिनांकाला सदर रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केली जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेक बँकांमध्ये मनुष्यबळाची संख्या मर्यादित असून, प्रतिबंध क्षेत्रातील बँक बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाने वीजबिलांकरिता धनादेश दिला असेल तर बँकांकडून धनादेश वटवण्यास उशीर होत आहे. वीजबिलांच्या देय मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचे बिल थकबाकीसह येण्याची शक्यता आहे. तसेच काही कारणास्तव धनादेश बाउन्स झाल्यास त्यासाठी ७५० रुपये दंडदेखील पुढील वीजबिलात लागू शकतो. यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागेल. ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी महावितरण मोबाइल ॲप तसेच www.mahadiscom.in या वेबसाइटचा वापर केल्यास ग्रहकांना वीजबिल भरणा केंद्रावर यावे लागणार नाही, असे महावितरणच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Exit mobile version