कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जैन हिल्सवर प्रातिनिधीक पोळा साजरा

जळगाव, प्रतिनिधी । ‘‘शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हाच माझा सर्वोच्च पुरस्कार!’’ मानणाऱ्या श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी जैन हिल्सवर भूमिपुत्र आणि सहकाऱ्यांसह पोळा साजरा करण्याची प्रथा सुरू केली. कोरोना पार्श्वभूमीवर जैन हिल्स येथे शासकीय नियम पाळून प्रातिनिधीक स्वरूपाचा छोटेखानी पोळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

 

भूमिपुत्रांशी बांधिलकी असणाऱ्या जैन इरिगेशनतर्फे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सौ. ज्योती जैन तसेच कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व सौ. शोभना जैन यांनी पोळ्याच्या सोहळ्यावेळी तेथेच मांडलेल्या सप्तधान्यासह बैल जोड्यांचे विधीवत पूजन करुन बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरविला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात सौ. ज्योती जैन व सौ. शोभना जैन यांच्या हस्ते पाच सालदार गडींना सपत्नीक भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. जैन इरिगेशनच्या कृषी विभागात पन्नास सालदार गडी कार्यरत आहेत. प्रस्तुत प्रातिनिधीक पूजनानंतर जैन हिल्स टॉप, भाऊंची सृष्टी, जैन डिव्हाईन पार्क, जैन व्हॅली व्यूव्ह, जैन लेक व्यूव्ह, टिश्यूकल्चर पार्क, टाकरखेडा अशा विविध स्थळी शेतीनिहाय विभागात स्वतंत्रपणे पोळा साजरा करण्यात आला. त्या-त्या विभागाच्या प्रमुखांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.

सुमारे २५ बैल जोड्यांना सजवून त्यांची भाऊंच्या समाधी स्थळापर्यंत (श्रद्धाज्योत) साध्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. श्रद्धेय मोठ्याभाऊंना नमन करणारा वृषभराज नम्रतेचं आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. पोळ्याचे तोरणही लावण्यात आले. यावेळी जैन रेसिडेन्सी पार्क विभागाचे सालदार गडी भगवान साबळे यांच्या बैलाने पोळा फोडला. आरोही जैन, अन्मय जैन, डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, संजय सोनजे, अजय काळे, पी. ए. पाटील, रवी कमोद, प्रसाद साखरे व सहकारी तसेच शेती विभागातील जैन हिल्स येथे रहिवास असलेल्या सालदार सहकाऱ्यांच्या परिवारातील सदस्यही आरोग्याच्या दृष्टीने पूर्ण सुरक्षितता बाळगून उपस्थित होते.

Protected Content