Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्याची तयारी करा

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात जुलै , आगस्ट , सेप्टेंबरमध्ये कधीही कोरोनाची तिसरी लाट उद्भवू शकते , त्याच्या मुकाबल्यासाठी हरतऱ्हेने तयार राहा असा सूचना मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिकांना दिल्या आहेत

 

राज्यात ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर झालेल्या बैठकीतही सूतोवाच झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या असून, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील माध्यमांशी बोलाताना याबाबत विधान केलं .

 

राजेश टोपे म्हणाले, “कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता केंद्राने वर्तवलेली आहेच. ती जुलै शेवट, ऑगस्ट, सप्टेंबर या दरम्यान राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याची पूर्व तयारी राज्य शासनााच्यावतीनं केली जात आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहेत की, आपण बेड वाढवण्याकडे लक्ष द्या, केवळ बेडची संख्या वाढवून चालणार नाही. त्याला लागणारं मनुष्यबळ, कुशल मनुष्यबळ, डॉक्टर्स, औषधी, ऑक्सिजन या सगळ्यासंदर्भात स्वतः आपण स्वयंपूर्ण झालो पाहिजेत. यासाठी आपण पीएसए दर्जाचे ऑक्सिजन प्लॅन्ट लावले पाहिजे. ऑक्सिजन जनरेटर मोठ्या पद्धतीने विकत घेतले पाहिजेत. आपण जे काही ग्लोबल एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट काढलं होतं, त्या संदर्भातील देखील जे काही प्रस्ताव विविध देशातून आलेले आहेत, त्याबाबत अंति निर्णय त्वरीत घेतला पाहिजे. असे आदेश आरोग्यमंत्री म्हणून मी आताच झालेल्या माझ्या व्हीसीमध्ये दिलेले आहेत.”

 

“लिक्विड ऑक्सिजन साठवण्यासाठी जे ऑक्सिजन टँक्स आहेत, ते जे काही ऑफर झालेल्या आहेत त्याच्या पीओ लवकर दिल्या गेल्या पाहिजेत. ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरच्याबाबत आमचं जे काही टास्क फोर्स आहे, त्यांनी लवकर त्यांना अप्रुव्हल दिलं पाहिजे.” असं देखील यावेळी टोपेंनी बोलून दाखवलं.

 

राज्यात तिसरी लाट जुलै-ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यापूर्वी आपण प्राणवायूच्या बाबतीत स्वंयपूर्ण झाले पाहिजे. प्रत्येक तालुक्यात प्राणवायूचा प्रकल्प  तयार पाहिजे. प्राणवायूसाठी आज जी धावपळ सुरु आहे, ती तेव्हा होता कामा नये . तिसऱ्या लाटेच्यावेळी प्राणवायू नाही ,अशी सबब कोणालाही सांगता येणार नाही, याची सर्वांना दक्षता घ्यावी ,असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यातील विभागीय आयुुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

 

महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास राज्यात तिसरी लाट येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांनी महाराष्ट्रातील परिस्थितीसंदर्भात इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने पुरेश्या प्रमाणामध्ये लसी उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वर्षांमधील व्यक्तींचं लसीकरण एक मे पासून सुरु न करता पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केल्यानंतर ही माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

 

तिसरी लाट येण्याची शक्यता असून  या लाटेची तीव्रता कमी करण्यासह आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढू नये यासाठी आत्तापासून उपाययोजना करणे गरजेचे आहे. पहिली आणि दुसरी लाट हाताळताना आढळेल्या उणीवा भरून काढण्यावर लक्ष केंद्रित करणेही आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ब्रिटनपासून अनेक देशांमध्ये दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट आली आहे. त्यामुळे राज्यातही तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version