Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाच्या गुणाकाराला अटकाव करण्यात यश- उध्दव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकाराला अद्याप पूर्ण यश लाभले नसले तरी या विषाणूच्या गुणाकाराला अटकाव करण्यात आल्याला यश आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतांना बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यांनी प्रारंभी अक्षय तृतीया, रमजान तसेच महात्मा बसवेश्‍वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आता सर्वच दिवस सारखे वाटत असून हे दिवस आपल्या कुणाला अपेक्षित नव्हते. तथापि, ही लढाई आपण लढत आहेत. सर्व धर्मियांनी सण बाजूला ठेवून कोरोनाच्या आव्हानाला सामारे जाण्याचे धाडस दाखविले ते कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. रमजानमध्ये रस्त्यावर अथवा मशिदीत नमाज न करता घरातून उपासना करण्याचे आवाहन केले. देव आपल्याल असून आपल्या संयमात देव आहे. डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार, आरोग्य सेवकांमध्ये देव असल्याचे ते म्हणाले. राज्यातील दोन पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे नमूद करत त्यांनी या दोघांना श्रध्दांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लॉकडाऊनचे काही चांगले परिणाम झालेत. यामुळे आपण गुणाकाराने वाढणार्‍या संकटाला आटोक्यात ठेवण्यासाठी नक्की यशस्वी झालेलो आहोत. आपण काही प्रमाणात तरी याची वाढ नियंत्रणात ठेवली आहे. लॉकडाऊन लवकरच संपविण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. लॉकडाऊनमध्ये काही जण राजकारण करत असले तरी नितीन गडकरी यांनी सकारात्मकता दाखविल्याने ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान, ३ मे रोजी लॉकडाऊन संपत असला तरी अद्याप कोरोनाचा पूर्णपणे प्रतिकार केल्याशिवाय हे शक्य नाही. कोरोनाच्या गुणाकाराला अटकाव करण्यात आपल्याला यश लाभले आहे. राज्यातल्या ग्रामीण भागात काही प्रमाणात शिथीलता देण्यात आलेली आहे. या सर्वांचा आढावा घेऊन ३ तारखेनंतर नेमका काय निर्णय व्हावा हे ठरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version