Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही : उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही, यासाठी प्रयत्नशील असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

 

आज प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान कोरोनाच्या महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ ५ रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला आहे. मागच्या आठवड्यात कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालकांना व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णय देखील राज्यशासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोरोनाबाधित आणि मृत्यू झालेली एकही केस लपवली नाही. पारदर्शकपणे माहिती देण्यात आली आहे. कोरोनाबाबत अनेकांच्या मनात भीती तर अनेकांमध्ये काहीही होत नाही अशी भावना आहे. परंतु पोटासाठी बाहेर पडण्याची गरजदेखील आहे. अशा तीन अवस्थेत कोरोनाचा सामना सुरु असल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या लोकांना इतर आजार झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर कोरोनानंतरही उपचार व्हावे यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात साथ रोग नियंत्रण रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Exit mobile version