कोरोनाची आपत्ती दूर सारण्यासाठी विठुरायाला साकडे

पंढरपूर । आषाढी एकादशीनिमित्त आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्नीक महापूजा केली. याप्रसंगी त्यांनी कोरोनाची आपत्ती दूर सारण्यासाठी विठुरायाला साकडे घातले. तर यंदा पाथर्डी येथील विठ्ठल बडे यांना पूजेचा सन्मान मिळाला.

आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. मंगळवारी रात्री राज्यातल्या मानाच्या नऊ पालख्या आणि दहा प्रमुख संस्थानांच्या पादुका पंढरपूरमध्ये दाखल झाल्या. पैठणचे संत एकनाथ महाराज संस्थान, संत निवृत्तीनाथ महाराज-त्र्यंबकेश्‍वर, सासवडचं सोपानदेव महाराज संस्थान, संत मुक्ताबाई -मुक्ताईनगर, विठ्ठल-रुक्माई संस्थान -कौंडिण्यपूर, अमरावती तसंच संत तुकाराम महाराज-देहू, संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान-आळंदी, संत नामदेव महाराज-सोलापूर, संत निळोबाराय संस्थान-पिंपळनेर या पालख्या एसटी बसमधून पंढरीत दाखल झाल्या.

यानंतर आज पहाटे विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणार्‍या पाथर्डी येथील विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला.

याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, विठुरायाची पूजा करण्याचा मान मला मिळेल हा मी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता.मान जरूर मिळाला पण अशा परिस्थितीमध्ये पूजा करावी लागेल हा ही कधी स्वप्नात मी विचार केला नव्हता. मी इथे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण विश्‍वाच्या वतीने माऊलीच्या चरणी साकडं घालायला आलो आहे. आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो असे विठुरायाच्या चरणी साकडं घातलं.

दरम्यान, पंढरपूर शहर आणि परिसरात ३० जूनपासून दोन जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.

Protected Content