Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाचा हवाई वाहतुकीला २१ हजार कोटींचा फटका

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना महासाथीचा सर्वाधिक फटका विमान आणि पर्यटन क्षेत्राला बसला आहे. क्रेडिट रेटिंग संस्था इक्रा लिमिटेड अहवालानुसार २०२१ या आर्थिक वर्षात विमान क्षेत्राला जवळपास २१ हजार कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.कोरोना निर्बंधांमुळे विमान कंपन्यांना हा तोटा सहन करावा लागणार आहे.

विमान कंपन्यांना आपल्या तोट्यातून तसंच कर्जातून बाहेर येण्यासाठी २०२१ या आर्थिक वर्षापासून २०२५ या आर्थिक वर्षापर्यंत ३७ हजार कोटी रूपयांच्या अतिरिक्त निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे या क्षेत्रावर नकारात्मक परिणाम जाणवणार असल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं. प्रवाशांच्या संख्येवरही मोठा परिणाम झाला आहे.

महासाथीमुळे २३ मार्च नंतर देशांतर्गत सेवांसोबतच आंतरराष्ट्रीय सेवांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. कमी उत्पन्न आणि अधिक खर्च यामुळे विमान क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. परंतु सध्या यामध्ये आता सुधारणा दिसून येत आहेत, .

आर्थिक वर्ष २०२२ पर्यंत लीजबाबतची देणी सोडून विमान उद्योग क्षेत्रावरील कर्ज वाढून ५० हजार कोटी रूपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. इंडिगो आणि स्पाईसजेट लिमिटेड यांना आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते सप्टेंबर २०२० दरम्यान दररोज ३१ कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. आता ते दररोज २६ कोटी रूपयांपर्यंत आलं असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

Exit mobile version