Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरानावर मात करण्यासाठी भारत सरकार सज्ज – केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. विकसित देशांमध्ये आहे तितकी गंभीर परिस्थिती आपल्याकडे निर्माण होणार नाही असेही केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले आहे. दरम्यान देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या ६० हजाराच्या आसपास पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, “इतर विकसित देशांप्रमाणे आपल्याकडे परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची शक्यता आम्हाला वाटत नाही. मात्र तरीही गंभीर परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने आम्ही पूर्ण तयारी केली आहे”. जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ३३२० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ९५ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता ५९ हजार ६६२ वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३९ हजार ८३४ रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले १७ हजार ८४७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १९८१ जणांचा समावेश आहे.

करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पुन्हा वाढला असून तो १२ दिवसांवरून आता १० दिवसांवर आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये केंद्राची पथके सातत्याने पाहणी करत असल्याचे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी माहिती दिलीय.

Exit mobile version