Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोथळी येथे भागवत कथा व किर्तन सप्ताह उत्साहात

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | भारत हा विविधतेत नटलेला असतानाही संस्कृतीमध्ये एकता आहे. पुराणात विविधता पण देवत्त्वात एकता आहे. देवाला पूजताना भाव आवश्यक असल्याचे प्रतिपादन आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांनी चौथ्या दिवसाचे श्रीमद् भागवत कथेचे निरुपण करताना केले.

अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या प्रेरणेने सनातन सतपंथ परिवाराद्वारे आयोजित कोथळी येथे श्री आदिशक्ती मुक्ताईच्या दरबारात भागवत कथा व किर्तन सप्ताहाला भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. श्रीमद् भागवत कथेचे सुंदर निरुपण करताना आचार्य अमृत आश्रम स्वामी महाराज यांनी राजा बळीची कथा वर्णन केली. तन मन धनाने आपण जी सेवा करीत असतो. त्याचा अभिमान येणार नाही. व मी केले असा विचार मनात येणार नाही. अशी काळजी घेण्याचे आवर्जून सांगितले. आपण केलेल्या दानात ‘मी’ पणा आला तर आपणास फलश्रुती प्राप्त होत नाही. महर्षी अंबरिश व दूर्वा सांचे चरित्र सांगून देवभक्त आधीन आहे. असे त्यांनी सूचित केले. म्हणून माणसाने भगवंताची सेवा करताना अहंकार व मी पणा बाजूला ठेवावा असे सांगितले. हिंदू संस्कृतीनुसार आपण सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. असे आदल्या दिवशी झालेल्या किर्तन सोहळ्यात हभप ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर यांनी निरुपणात सांगितले. संतांची, सज्जनांची संगत धरल्यास साधकाला संत स्वतः सारखे बनवितात. त्यांच्या आशीर्वादाने आत्मविश्वास मिळतो व आपण अनमोल बनतो. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज व भक्त गावबाचे चरित्र सांगून आपण आपल्या पुढच्या पिढीला हिंदू ग्रंथ व परंपरेचे ज्ञान द्यावे असे आवाहन ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी उपस्थित श्रोत्यांना सांगितले. आदिशक्ती मुक्ताईच्या दरबारात शिस्तबद्ध कार्यक्रमात वारकरी संप्रदाय व संतपंथ संप्रदाय यासह ठिकठिकाणाहून आलेल्या भाविकांनी धर्ममंडप खच्चून भरला असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्व श्रोते लाईव्ह प्रक्षेपणाचा मोठया संख्येने लाभ घेत आहे.

Exit mobile version