Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केरळ, बंगालमध्येही निवडणुका आहेत, तिथे निर्बंध का नाहीत?; अजितदादांचा सवाल

 

पुणे: वृत्तसंस्था । राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी , वीकेंड लॉकडाऊन राहणार आहे  या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीला हे निर्बंध लागू असतील काय? असा सवाल करण्यात आला. त्यावर केरळ, बंगालमध्येही निवडणुका आहेत. तिथे निर्बंध नाहीत का? असा सवाल लोक विचारत आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत कोरोनाचे निर्बंध लागू होणार नाहीत का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा केंद्र सरकारनेच पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक लावली आहे. त्यामुळे ते क्षेत्र अपवाद आहे. बंगाल, केरळातही निवडणुका होत आहेत. तिथे निर्बंध का नाहीत? असा सवाल केला जात आहे. पण नियम पाळून प्रचार करण्यात येत आहे. पंढरपुरातही नियम पाळून प्रचार केला जाईल, असं अजित पवार म्हणाले.

 

 

भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या समोर बैठकीत लॉकडाऊनबाबतचे निर्णय घेण्यात आले. अनेक विषयावर चर्चा झाली. आतली चर्चा बाहेर करायची नसते. पण सर्वांनी चर्चा करूनच निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले. लॉकडाऊन कुणालाही नको आहे. पण लोकं ऐकत नाहीत. त्यामुळे पर्यायच उरला नाही. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सल्ला दिल्यानेच हा निर्णय घ्यावा लागेल, असं ते म्हणाले.

 

आताची लाट वेगळी आहे. पूर्वी एक व्यक्ती बाधित झाल्यानंतर तोच किंवा त्यांच्या संपर्कातील एक दोन जण बाधित व्हायचे. आता एक व्यक्ती बाधित झाल्यानंतर त्याचं संपूर्ण कुटुंब बाधित होतं, असं ते म्हणाले. रुग्णाला ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

Exit mobile version