Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केरळमध्ये मान्सूनची दमदार हजेरी

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । गुरुवारी दक्षिण-पश्चिम मान्सूनने दोन दिवस उशिराने केरळमध्ये हजेरी लावली. हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी ‘नैऋत्य मॉन्सूनने केरळच्या दक्षिणेकडील भागात पाऊस सुरू केल्याचे सांगितले

 

हवामान विभीगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशमधील काही भागांमध्ये 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मॉन्सून साधारणत: 1 जूनपर्यंत केरळला पोहोचतो. यानंतर आता ईशान्य भारताच्या दिशेने मान्सून प्रवास करेल. 10 जूनपर्यंत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता आहे.

 

जूनच्या मध्यापर्यंत मॉन्सूनच्या प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण ओडिशाचा काही भाग व्यापला जाईल. हिमालयीन  पश्चिम बंगालमध्येही मान्सूनचा पाऊस पडेल. जुलैच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देशात हजेरी लावेल.

 

येणारा पावसाळा सलग तिसऱ्या वर्षी देशभरात समाधानकारक असेल, असा अंदाज ‘स्कायमेट वेदर’ या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. मंगळवारी स्कायमेटने मान्सूनच्या दीर्घकालीन अनुमानाविषयी ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. सन २०२१ मध्ये सरासरीच्या १०३ टक्के (+/- ५ टक्के) पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सरासरीइतका पाऊस पडेल, असाही अंदाज आहे.

 

जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरी ८८०.६ मिलिमीटर पाऊस पडतो. या काळात यंदा ९०७ मिलिमीटर पाऊस पडू शकेल. स्कायमेटने जानेवारीमध्ये वर्तवलेल्या अंदाजामध्येही यंदा पाऊस सरसरीइतका पडण्याची शक्यता वर्तवली होती.

येत्या पावसाळ्यामध्ये देशाच्या उत्तर भागात काही ठिकाणी, तसेच ईशान्येकडे काही भागांत कमी पावसाची शक्यता आहे. कोकणात सरासरीहून पाऊस कमी असू शकेल. कर्नाटकाच्या अंतर्भागांमध्येही जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडू शकेल, अशी शक्यता आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि सप्टेंबरमध्ये देशातून माघार घेत असताना संपूर्ण देशात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

Exit mobile version