Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केरळमध्ये भाजपकडून मुस्लिम , ख्रिश्चनांना उमेदवारी

 

 

थिरुवअनंतपूरम : वृत्तसंस्था । केरळमधल्या पंचायत निवडणुकीत भाजपाने तब्बल १०० पेक्षा जास्त मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. केरळमध्ये आठ, दहा आणि १४ डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री के.एस.ईश्वरप्पा यांच्या एका विधानावरुन वाद निर्माण झाला होता. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकिट देणार नाही, असे विधान त्यांनी केले होते. पण शेजारच्याच केरळमध्ये मात्र भाजपाने बिलकुल या उलट केले आहे. तिथे भाजपाने सोशल इंजिनिअरींगचा एक वेगळा प्रयोग केला आहे.

पंचायत स्तरावरील या निवडणुकीसाठी भाजपाने ५०० ख्रिश्चन आणि ११२ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. इतक्या मोठया प्रमाणात ख्रिश्चन आणि मुस्लिमांना उमेदवारी देणे हा भाजपाचा अल्पसंख्यांक समाजापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे.

केरळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनांची मिळून ४५ टक्के लोकसंख्या आहे. हिंदुंची लोकसंख्या ५५ टक्के आहे. केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया भक्कम आहे. पण संघपरिवार त्या राज्यात मजबूत स्थितीमध्येही असूनही भाजपाला त्याचा लाभ मिळालेला नाही. केरळमध्ये विधानसभा निवडणुकीला अजून सहा महिने बाकी आहेत. केरळमध्ये स्वत:चा राजकीय पाया भक्कम करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

१९८० सालापासून केरळमध्ये सीपीआयएमच्या नेतृत्वाखाली एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफची आलटून-पालटून सत्ता आली आहे. मजबूत हिंदुत्वाचा आधार घेऊनही भाजपाला या राज्यात फायदा झाला नाही. पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राज्य़ात पाया भक्कम करण्यासाठी भाजपाने ख्रिश्चन आणि मुस्लिमांना मोठया प्रमाणात उमेदवारी दिलीय.

Exit mobile version