Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्णयाची शक्यता

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यात आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत भरपाईबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत साखरेच्या निर्यातीवर 3600 कोटींची सबसिडी मिळण्याची शक्यता आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना ऊर्वरीत रक्कम देण्याचाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकार आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत भरपाईबाबत निर्णय घेऊ शकते. अन्न मंत्रालयाने 2020-21च्या मार्केटिंग वर्षासाठी 60 लाख टन साखर निर्यातीसाठी 3600 कोटी रुपयांच्या सबसिडीचा प्रस्ताव तयार केला आहे.

गेल्या वर्षी मार्केटिंग ईयर 2019- 20 मध्ये केंद्र सरकारने 10,448 रुपये प्रति टन एकरकमी निर्यात सबसिडी दिली होती. त्यामुळे केंद्राच्या तिजोरीवर 6268 कोटी रुपयांचा आर्थिक ताण पडला होता. मात्र, यंदा चालू विपणन वर्षात गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी निर्यात सबसिडी देण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला आहे.

आकडेवारी नुसार साखर कारखान्यांनी 2019-20च्या हंगामासाठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) निर्धारित 6 मिलियन टनाच्या अनिवार्य कोट्याच्या तुलनेत 5.7 मिलियन टन साखरेची निर्यात केली होती. सरकार साखरेच्या निर्यात सबसिडीच्या विस्तारावर पुनर्विचार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताला स्वीटनर विकण्याची चांगली संधी असल्याने हा विचार केला जात असल्याचं गेल्या महिन्यात अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले होते.

Exit mobile version