Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्रीय पथकाव्दारे सर्वेक्षण करावे ; महापौर भारती सोनवणे यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

जळगाव (प्रतिनिधी)  शहरात व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच नागरीकांचे आरोग्य अबाधित ठेवणेच्या दृष्टीने केंद्रीय पथकाकडून सर्वेक्षण करणे कामी संबंधित पथकास जिल्हा दौऱ्यावर पाठवून उपाययोजना सुचवून संबंधितांना योग्य आदेश करावे, अशी विनंती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे. दरम्यान, महापौरांच्या विनंतीनंतर खा.उन्मेष पाटील यांनी तात्काळ आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिवांना याबाबत अवगत केले असता दि.५ जून रोजी महाराष्ट्र केंद्रीय पथक पाठविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

शहरासह जिल्ह्याने मृत्युदरात महाराष्ट्रातील असंख्य महानगरांना मागे सोडलेले असून मृत्युदर वाढतच आहे. सद्यस्थितीत जळगांव जिल्हा मृत्युदराच्या रांगेत चौथ्या क्रमांकावर असून याबाबत दैनंदिन वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांवर दररोजच्या वृत्तांनुसार स्थिती अत्यंत चिंताजनक व गांर्भीयाची झालेली असून स्थानिक नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. देशासह जळगाव शहरात कोरोना व्हायरस (कोविड 19) चा प्रादुर्भाव पसरलेला असून त्यास समस्त देशवासी, कोरोना योद्धा लढा देत आहेच. सद्यस्थितीत शासन आदेशानुसार देशासह आपल्या शहरात लॉकडाऊन सुरु असून फक्त अत्यावश्यक सेवा फिजीकल डिस्टन्स ठेवून सुरू असुन शहरातील नागरीकांचे आरोग्य अबाधित ठेवणेसाठी जिल्हा प्रशासनासह महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना सुरु आहेत.

 

मृत्यूदराचा वाढता आलेख

सद्यस्थितीत शहरात दिवसोंदिवस कोरोना व्हायरस (कोविड 19) चा संसर्ग वाढत असून केंद्र शासनाने निर्धारीत केलेल्या 1 ते 5 लॉकडाऊन फेजच्या कालावधीत अनुक्रमे पहिल्या फेजमध्ये २ रुग्ण त्यापैकी १ मृत्यू, दुसऱ्या फेजमध्ये ७ रुग्ण त्यापैकी १ कोरोना मुक्त व १ मृत्यू, तिसऱ्या फेजमध्ये ४३ रुग्ण त्यापैकी १२ कोरोना मुक्त व २ मृत्यू, चौथ्या फेजमध्ये ८२ रुग्ण त्यापैकी ५५ कोरोना मुक्त व ९ मृत्यू आणि पाचव्या फेजमध्ये १६५ रुग्ण त्यापैकी ९० कोरोना मुक्त व १७ मृत्यू अशी चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे.

 

माध्यमातून प्रसिद्ध वृत्त

संपुर्ण जळगांव जिल्ह्याची स्थिती दि.२ जून रोजीच्या लोकमत, दिव्य मराठी, सकाळ यासह इतर स्थानिक वृत्तपत्रकिय वृत्तानुसार राज्यातील प्रमुख मोठे महानगर मुंबई रुग्ण संख्या ३९६८६ पैकी मृत्यु संख्या १२७९, पुणे रुग्ण संख्या ७४८२ पैकी मृत्यू संख्या ३२०, ठाणे रुग्ण संख्या ४४३० पैकी मृत्यू संख्या ९१ आणि तद्नंतर जळगांव जिल्हा रुग्ण संख्या ७५१ पैकी मृत्यू संख्या ८१ अशी आहे. राज्यातील साम वृत्तवाहिनीच्या बातमी नुसार देशात कोराना बाधितांचा मृत्युदर सुमारे २.८७ आहेत तर एकट्या जळगांव जिल्ह्याचा मृत्युदर सुमारे ११.४९ असल्याबाबत प्रसिध्द झालेले आहे.

 

पत्राद्वारे केली महापौरांनी विनंती

दैनंदिन वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांवर दररोजच्या वृत्तांनुसार स्थिती अत्यंत चिंताजनक व गांर्भीयाची झालेली असून स्थानिक नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शहरात व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच नागरीकांचे आरोग्य अबाधित ठेवणेच्या दृष्टीने केंद्रीय पथकाकडून सर्वेक्षण करणे कामी संबंधित पथकास जिल्हा दौऱ्यावर पाठवून उपाययोजना सुचित करून योग्य कार्यवाही करणे कामी संबंधितांना आदेश द्यावे, अशी विनंती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे. महापौरांनी निवेदन मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, खा.उन्मेष पाटील यांना देखील पाठवले आहे.

 

खा.उन्मेष पाटील यांनी स्विकारली जबाबदारी, जळगावात येणार पथक

जळगाव शहरात रुग्णांची वाढत असलेली रुग्णसंख्या आणि वाढलेला मृत्युदर लक्षात घेता महापौर सौ.भारती सोनवणे यांनी खा.उन्मेष पाटील यांना निवेदन पाठवले तसेच फोनद्वारे देखील चर्चा केली व केंद्रस्तरावर पाठपुरावा करून समिती जिल्ह्यात बोलावण्याची जबाबदारी स्विकारण्याची विनंती केली. खा.उन्मेष पाटील यांनी तात्काळ पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री व आरोग्य मंत्रालयाला पाठविले. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि कोरोना उपाययोजनाचे नोडल अधिकारी लव अग्रवाल यांच्याशी खा.उन्मेष पाटील यांनी फोनद्वारे चर्चा करून जिल्ह्याची गंभीर परिस्थिती लक्षात आणून दिली असता दि.५ जून रोजी केंद्रीय पथक पुन्हा महाराष्ट्र पाठवणार आहे. समितीचे अध्यक्ष श्री.कुणाल (IAS) हे येणार असून ते जळगाव जिल्ह्यात येण्यापूर्वी संपर्क करतील अशी माहिती अग्रवाल यांनी खा.उन्मेष पाटील यांना दिली आहे.

Exit mobile version