Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्रीय गृहमंत्र्यांचा नक्षलवाद्यांना थेट इशारा

 

 

रायपूर : वृत्तसंस्था |  काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधातील लढाई निर्णायक वळणावर पोहचल्याचं पहायला मिळत आहे. मात्र या दुर्देवी हल्ल्यामुळे नक्षलवादाविरोधातील लढाई अधिक तीव्र झालीय,” असंही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांनी छत्तीगड येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर नक्षलवादाविरोधातील आपली लढाई आणखीन ताकदीनं लढू  आणि या लढाईत आपण नक्कीच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केलाय. संरक्षण दलांची पथके आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडच्या जंगलात झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाल्याची माहिती रविवारी समोर आली. नक्षलवाद्यांनी घडवलेले हे अलीकडच्या काळातील मोठे हत्याकांड ठरलं असून याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली. सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची पहाणी शाह यांनी केली तसेच त्यांनी शहीद जवानांना देशाच्या वतीने श्रद्धांजलीही अर्पण केली.

 

“पंतप्रधान, केंद्र सरकार आणि संपूर्ण देशाच्या वतीने मी या नक्षलवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या संरक्षण दलातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. या जवानांचं बलिदान देश कायमच लक्षात ठेवले. या जवानांनी नक्षलवादाविरोधात दिलेला हा निर्णायक लढा कायमच स्मरणात राहील,” असं शाह यांनी जगदालपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.

 

“मी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल आणि संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या अधिकाऱ्यांनी हा लढा असाच सुरु ठेवला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. यावरुन आपल्या संरक्षण दलातील जवानांचे नक्षलवादाविरोधात लढा देण्याचं धैर्य कायम असल्याचं दिसून येत आहे,” असं शाह म्हणाले.

 

मी प्रत्येक भारतीयाला आश्वासन देतो की ही नक्षलवादाविरोधातील लढाई भविष्यात अधिक तीव्र होणार असून शेवटी आपलाच विजय होणार आहे. आपण मागील काही वर्षांमध्ये यशस्वीपणे अनेक अंतर्गत भागांमध्ये संरक्षण दलांच्या छावण्या उभारल्या आहेत. त्यामुळेच नक्षलवाद्यांनी संतापून अशाप्रकारचा हल्ला केलाय,” असंही सांगितलं.

 

अमित शाह यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे दोन महत्वाच्या गोष्टींवर काम करत नक्षलवादाला तोंड देण्याचा प्रयत्न करत असल्याचं यावेळी स्पष्ट केलं. आदिवासी भागामध्ये विकासकामांना गती देणं आणि सशस्त्र लढ्याला चोख उत्तर देण्याच्या माध्यमातून नक्षलवादाविरोधात दुहेरी लढा सुरु असल्याचा शाह यांनी सांगितलं. या हल्ल्यानंतर नक्षलवादाविरोधातील लढा अधिक तीव्र होणार असल्याचं मी छत्तीसगडमधील नागरिकांना आणि सर्व देशवासियांना सांगू इच्छितो, असंही शाह यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version