Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । काही महिन्यांपासून थकबाकीसह महागाई भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आज मोठी भेट दिली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वीच केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढीसह थकबाकी देण्यास संमती दिली होती. मात्र, निर्णय कधी होणार याकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं होतं.

 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महागाई भत्त्यात तब्बल ११ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर गेला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याचे तीन हफ्ते प्रलंबित आहेत. सरकारने कोरोनामुळे महागाई भत्त्याला स्थगिती दिल्यानं हे हफ्ते प्रलंबित असून, सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या हातात घसघशीत पगार येणार आहे.

 

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात यापू्र्वी जुलै २०२० मध्ये ३ टक्के वाढ केली  होती. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. मात्र कोरोनानं शिरकाव केल्यानंतर केंद्र सरकारच्या महसूलावर मोठा परिणाम झाला. तिजोरीला फटका बसल्यानं केंद्राने केंद्र सरकारने महागाई भत्त्यातील चार टक्के वाढ जुलै २०२१ पर्यंत रोखली होती.  महागाई भत्त्यात जुलै २०२१ नंतरच वाढ होईल, असंही सरकारने त्यावेळी म्हटलं होतं.

 

महागाई भत्ता आणि थकबाकी  १ जानेवारी २०२० पर्यंत रोखण्यात आली  होती . त्यानंतर पुन्हा १ जुलै २०२१ पर्यंत स्थगिती देण्यात आलेली असल्यानं सरकार आता काय निर्णय घेणार याकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं होतं. मागील आठवड्यात याबद्दल निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारामुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. आज झालेल्या बैठकीत महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिल्याची खात्रीलायक माहिती असून, सप्टेंबरपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

 

Exit mobile version