Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्रावर आरोप करा आणि पाप झाका ; राज्यातील मंत्र्यांना एवढेच काम — राधाकृष्ण विखे पाटील

 

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात लसीच्या तुटवड्यावरून भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर परखड टीका केली आहे. “मंत्र्यांना सध्या मुख्यमंत्र्यांनी एकच काम दिलंय. केंद्रावर आरोप करा आणि आपलं पाप झाका. जनतेला वाऱ्यावर सोडल्याची भावना झाली आहे”, असं विखे पाटील म्हणाले

 

. “आता केंद्रावर बोट दाखवण्यापेक्षा रेमडेसिवीर, ऑक्सिजन उपलब्ध करा. प्रत्येक मंत्र्याला आपापल्या मतदारसंघात २०० बेडचं कोविड रुग्णालय उभारायला सांगा. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचं समाधान करू शकणार नाही”, असा टोला देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

 

“इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्याला व्हॅक्सिन मिळालं. पण त्याचं नियोजन राज्य सरकार करू शकलं नाही. तो नियोजनशून्य कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण केंद्राकडे बोट दाखवतोय. पण हजारो रुग्ण आज हॉस्पिटलमध्ये आहेत. हजारो रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. नगरमध्ये रेमडेसिवीर मिळत नाहीयेत, आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत”, असं ते म्हणाले.

 

काही दिवसांपासून राज्यात लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं देखील चित्र असून राज्याला पुरेसे लसीचे डोस मिळावेत, अशी मागणी राज्य सरकारकडून केली जात आहे. दुसरीकडे केंद्र सरकारकडून पुरेसे लसीचे डोस दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.

 

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना खोचक टोला लगावला. “नगर जिल्ह्यात ४ मंत्री आहेत. इथले पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात. त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात ते एकही कोविड रुग्णालय सुरू करू शकलेले नाहीत. सगळं खासगी रुग्णालयांच्या भरवश्यावर सोडलंय. जिल्ह्यातले ३ -३ मंत्री करतात काय?”, असा सवाल विखे पाटील यांनी केला आहे.

Exit mobile version