Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्राच्या खेल प्राधिकरणातून महाविद्यालयांच्या क्रीडांगणासह खेळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील – खा.उन्मेश पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी । “जो खेलेगा वही खिलेगा” या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील क्रीडापटूंचा भारत घडविण्यासाठी केंद्राच्या खेल प्राधिकरणातून ज्या महाविद्यालयांमध्ये मोठी मैदाने उपलब्ध आहे. अशा महाविद्यालयांच्या क्रीडागणाचा विकासाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा अशी सूचना खेल प्राधिकरणाला केली आहे. चाळीसगाव, धरणगाव, शहादा सारख्या महाविद्यालयांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यासाठी भारतीय खेल प्राधिकरणाने तत्वत : मान्यता दिली असून येत्या काळात भारतीय खेल प्राधिकरणाच्या माध्यमातून खेळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही खा. उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आज भारतीय खेल प्राधिकरणाच्या माध्यमातून चाळीसगाव महाविद्यालय येथे आयोजित जळगाव जिल्ह्यातील क्रीडा संचालकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार उन्मेश पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायण अग्रवाल तर पश्चिम भारतीय खेळ प्राधिकरणाचे संचालक वीरेंद्र भांडारकर (औरंगाबाद) यांची प्रमुख उपस्थिती होती. खा.उन्मेश पाटील यांच्या मार्गदर्शनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सिनियर कॉलेज कमिटी चेअरमन डॉ.एम.बी.पाटील, क्रीडा समिती चेअरमन क.मा.राजपूत , जेष्ठ संचालक नगरसेवक सुरेश स्वार, व्ही.एच. पटेल शाळेचे चेअरमन राजू चौधरी संस्थेचे बांधकाम समिती चेअरमन तथा उद्योजक योगेश अग्रवाल, प्राचार्य डॉ.एम.व्ही. बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर , क्रीडा संचालक प्रा. एस बी.सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खेल प्राधिकरणाचे संचालक वीरेंद्र भांडारकर यांनी केंद्रांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राचा विकास तळागाळात पोहचविण्यासाठी खासदार उन्मेश पाटील यांची तळमळ अभिनंदनीय असून त्यांच्या सूचनेनुसार येथील महाविद्यालयाच्या बावीस एकरच्या मैदानात इनडोअर स्टेडियम प्रस्ताव तातडीने मंजूर केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. चेअरमन नारायण अग्रवाल यांनी खा. उन्मेश पाटील यांच्या वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करीत. यापुढे देखील महाविद्यालयाच्या क्रीडा विकासात खा.उन्मेश यांनी हातभार लावावा अशी भावना व्यक्त केली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दींकर यांनी तर आभार एस.बी.सोनवणे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.वि.रा.राठोड यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील क्रीडा संचालक उपस्थित होते.

Exit mobile version