Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्राचा बंडोपाध्याय यांना इशारा

 

कोलकाता : वृत्तसंस्था । दिल्लीत हजर न झाल्याबद्दल केंद्राने  पश्चिम बंगालचे सेवानिवृत्त मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उत्तर न दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला  आहे.

 

हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. एका बैठकीवरून निर्माण झालेल्या नाराजी नाट्याचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. पश्चिम बंगालचे सेवानिवृत्त मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीतील मोदी सरकार यांच्यात  संघर्ष पेटला आहे. ममता बॅनर्जी यांनी बंडोपाध्याय यांना मुदतवाढ दिल्यानंतर केंद्राने त्यांना दिल्लीत बोलावलं होत. पण बंडोपाध्याय यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांची मुख्यमंत्र्यांचे सल्लागार नियुक्ती करण्यात आली.

 

ममता बॅनर्जी यांनी माजी मुख्य सचिव आणि सध्याचे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अल्पन बंडोपाध्याय यांचा सेवा कालावधी सहा महिन्यांनी वाढविला होता. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना परत केंद्रात बोलवलं होतं. सोमवारी  दिल्लीत हजर होण्याचे आदेश बंडोपाध्याय यांना देण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना सेवेतून मुक्त करण्यास नकार दिला होता. हा संघर्ष वाढण्याची शक्यता दिसून आल्यानंतर बंडोपाध्याय यांनी दिल्लीत न जाता सेवानिवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांची मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली.

 

केंद्राने पंतप्रधान मोदींच्या बैठकीला गांभीर्याने न घेतल्याप्ररकरणी अल्पन बंडोपाध्याय यांना धारेवर धरलं आहे. बंडोपाध्याय यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये मोदींच्या बैठकीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांसोबत बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला आपण उशिराने आलात आणि लगेच निघूनही गेलात. हे बैठकीला अनुपस्थित असल्याचं ग्राह्य धरलं जाईल. पंतप्रधान आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. आपली वागणूक केंद्राकडून देण्यात आलेल्या निर्देशांकडे कानाडोळा करणारी समजली जाईल. आपल्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या ५१ (ब) नुसार कारवाई का करण्यात येऊ नये. तीन दिवसांत नोटीसीला उत्तर द्यावं,” असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. उत्तर न दिल्यास वा उत्तर समाधानकारक नसल्यास बंडोपाध्याय यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

 

गेल्या आठवड्यात पश्चिम बंगाल आणि ओडिशाला यास चक्रीवादळाने तडाखा दिला. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पंतप्रधान मोदी यांनी हवाई पाहणी केली. त्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव ३० मिनिटं उशिराने पोहोचल्यावरून राजकीय संघर्षांची ठिणगी पडली. याच काळात सेवानिवृत्ती होत असलेल्या मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांना ममता बॅनर्जी यांना मुदतवाढ दिली होती. त्यांना कोरोना व्यवस्थापनाचा अनुभव असल्यानं राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत होईल, असं ममतांनी म्हटलं होतं. मात्र, केंद्र बंडोपाध्याय यांना दिल्लीत बोलवण्यावर ठाम राहिल्याने ममतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत बंडोपाध्याय निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यांची मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करत असल्याचंही त्या म्हणाल्या होत्या.

 

Exit mobile version