कृषी मंत्री ना. दादा भुसे यांची निर्मल जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळेला भेट

पाचोरा, प्रतिनिधी ।   बि – बियाणे व कृषी जैविक उत्पादन निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेली येथील निर्मल सिडस्‌च्या जागतीक दर्जाच्या निर्मल कृषी जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळेला महाराष्ट्राचे कृषी मंत्री ना. दादा भुसे यांनी भेट देऊन निर्मल सिड्सचे कौतुक केले.

 

पाचोरा येथील दौऱ्यामध्ये कृषी मंत्री दादा भुसे यांनी निर्मल सिडस्‌ला भेट देऊन देशभर नावाजलेल्या आधुनिक युगाच्या पेटेन्टेड टेकनॉलॉजीच्या निर्मल कृषी जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळेची त्यांनी मोठ्या उत्सुकतेने पाहणी केली. शेतीचा शाश्वत विकास आणि शेतकऱ्यांची समृध्दी यासाठी गरजेवर आधारीत संशोधन व नवं तंत्रज्ञान हे उदात्त ध्येय डोळ्यासमोर ठेवुन निर्मल सिड्सने टेरी या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या सहकार्याने ही अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारुन कृषी क्षेत्रातील आधुनिक युगाचे जैविक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. माजी आमदार व संस्थापकीय अध्यक्ष स्व. आर.ओ. (तात्या) पाटील यांनी भविष्यातील शेतीची गरज ओळखुन रासायनिक खतांचा वापर व खर्च कमी करण्यासाठी आणि सेंद्रिय शेतीला बळ देण्यासाठी त्यांनी धाडसी व दुरदृष्टीतुन, नवनिर्मितीच्या भव्य संकल्पनेतुन ही अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारली. निर्मल जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळा ही जागतीक दर्जाच्या विविध किर्तीमान मानके व गुणवत्तेच्या क्लास १० हजार या उच्च कोटीच्या अत्याधुनिक गुणवत्तेच्या वर्गात (फार्मा श्रेणी) असुन उच्च कोटीच्या मानकांनी प्रमाणित असुन ती अशा विशिष्ट प्रकारच्या संशोधनासाठी देशातली पहिली कृषी जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळा आहे. रुट ऑरगन कल्चर या पेटेन्टेड टेकनॉलॉजीव्दारे मायकोरायझल जैविक खत रायझामिकाचे उत्पादन ह्या प्रयोगशाळेत केले जाते. जे जगातल्या शेतीसाठी फार मोठे वरदान आहे. भारावून सोडणाऱ्या व कृषी क्षेत्राला अभिमान वाटेल अशा भव्य दिव्य जैविक प्रयोग शाळेची पाहणी करतांना कृषि मंत्र्यांनी निर्मल सिड्सचे भरभरुन कौतुक केले. यावेळी पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, निर्मल सिड्सचे महाव्यवस्थापक सुरेश पाटील, पी. ए. दळवी, नगराध्यक्ष संजय गोहील, जि.प. सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, अॅड. दिनकर पाटील, मुकुंद बिल्दीकर, रवी केसवाणी, गणेश पाटील अॅड. अभय पाटील इत्यादी उपस्थित होते.

Protected Content