Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुंभमेळा प्रतीकात्मक असावा — मोदी

 

 

 

 

हरिद्वार : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून  बोलताना कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याची विनंती केली

 

देशात कोरोनाचं संकट गंभीर झालेलं असताना  उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभमेळा सुरू आहे. देशभरातून भाविक कुंभमेळ्यासाठी दाखल झाले असून, लाखो भाविक हरिद्वारमध्ये जमले आहेत. कुंभमेळ्यातही कोरोनाचा शिरकाव झाला असून, येणाऱ्या काळात कुंभमेळ्यामुळे देशातील परिस्थिती बिघडू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

 

हरिद्वारमधील कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून, अनेक साधू आणि भाविकांना  लागण झाली आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुना आखाडाचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याकडे कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याचं आवाहन केलं आहे.

 

मोदी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. “आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी आज फोनवरून संवाद साधला. सर्व संतांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करत आहेत. याबद्दल मी संतांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर मी विनंती केली की, दोन शाही स्नान झाले आहेत आणि कोरोनाच्या संकटामुळे कुंभमेळा आता प्रतिकात्मक पद्धतीने व्हावा. यामुळे संकटाशी लढण्याला ताकद मिळेल,” असं आवाहन मोदींनी केलं आहे.

 

 

पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटनंतर स्वामी अवधेशानंद गिरी यांनीही ट्विट केलं आहे. “पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा आम्ही सन्मान करतो. जीवनाची रक्षा करणं मोठं पुण्य आहे. माझा जनतेला आग्रह आहे की, कोरोना परिस्थिती बघता मोठ्या संख्येनं स्नान करण्यासाठी येऊ नये. त्याचबरोबर नियमांचं पालन करावं,” असं स्वामी अवधेशानंद यांनी म्हटलं आहे.

 

 

हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात अनेक साधू आणि भाविकांना  संसर्ग झाला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालं आहे.  दुसरीकडे अनेक आखाड्यांनी कुंभमेळ्यातून परतीची घोषणा केली आहे.

Exit mobile version