Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरीट सोमय्या यांना कराड रेल्वे स्थानकावर उतरविले !

कराड | कोल्हापुर जिल्हाधिकार्‍यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यानंतरही तेथे जाण्याचा प्रयत्न करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज पहाटे कराड रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून मुंबईवरुन कोल्हापूरकडे जात होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याच्या अधिक माहितीसाठी सोमय्या कोल्हापूरकडे जात होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत आधीच जिल्हाबंदी केली होती. तथापि, या नंतरही ते कोल्हापूरकडे जाण्यासाठी निघाल्याने सर्वत्र औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले होते.

अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार पहाटे पावणे पाच वाजता माजी खासदार किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कराड येथे उतरले आहेत. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत असल्याची प्रतिक्रिया सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या थोड्या वेळात पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल करण्याची शक्यता असून याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version