Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कासोदा येथील जोशी परिवारातर्फे गौरी पुजन

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील कासोदा येथील अजय जोशी यांच्या परिवाराच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी गौरीच्या आगमनासाठी मोठी जय्यत तयारी केली होत. १३ सप्टेंबर रोजी दिवसभर गौरीचे पूजन करण्यात आले. आज १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी आनंदाने विसर्जन करण्यात आले आहे.

भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर भाद्रपदातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते. भारतीय परंपरा, संस्कृतीत गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक ठिकाणी गौराईचे पूजन महालक्ष्मी स्वरुपात केले जात असल्यामुळे याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जाते. रविवार १२ सप्टेंबर २०२१ रोजी  अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन झाले. काल १३ सप्टेंबर २०२१ रोजी गौरी पूजन करण्यात आले. गौरीचे विसर्जन करण्यात आले.

अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरींचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. म्हणून याला ज्येष्ठा गौरी पूजन असेही संबोधले जाते.

रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू, पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ यांसारखे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. तसेच शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे आदी पदार्थांचाही नैवेद्य दाखविण्यात आला. आज मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी गौरीचे विसर्जन करण्यात आले.

Exit mobile version