Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कार धरणात कोसळल्याने आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत !

 

 

 

पुणे : वृत्तसंस्था । पुण्यात पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कार कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली शुक्रवारी दुपारी  झालेल्या या अपघातात आईसह तीन मुलींचा मृत्यू झाला.  महिलेचा पती सुदैवाने या अपघातात बचावला असून ते जखमी आहेत.

 

अल्पना  भिकुले ( ४५), प्राजक्ता  भिकुले( २१), प्रणिता  भिकुले( १७), वैदेही  भिकुले( ८, सर्व रा. चव्हाणनगर, धनकवडी) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अल्पना यांचे पती विठ्ठल  ४६) हे बचावले असून ते जखमी  आहेत. विठ्ठल कार चालवत होते. भिकुले कुटुंबीय मूळचे वेल्हा तालुक्यातील आहेत. विठ्ठल, त्यांची पत्नी आणि तीन मुली गावी गेले होते. शुक्रवारी सर्वजण गावावरून पुण्याकडे परतत होते. उरण फाट्याजवळ विठ्ठल यांचे नियंत्रण सुटले आणि त्यांची कार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडली.

 

ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वेल्हे पोलिसांना दिली. त्यानंतर वेल्हे पोलीस आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मोटारीतील चौघांचा शोध घेण्यात आला. अल्पना, त्यांचे पती आणि तीन मुलींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच अल्पना, प्राजक्ता, प्रणिता, वैदेही यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याने  वेल्हे तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version