Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेस नेते सतीश शर्मा यांचे निधन

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । माजी केंद्रीय मंत्री आणि गांधी कुटुंबाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे कॅप्टन सतीश शर्मा यांचं निधन झालं आहे. गोव्यात त्यांनी अखेऱचा श्वास घेतला. ते ७३ वर्षांचे होते.

 

तीन वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या कॅप्टन सतीश शर्मा यांनी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. त्यांना कॅन्सर झाला होता,  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

 

कॅप्टन सतीश शर्मा राजीव गांधींचे निकटवर्तीय होते. पी व्ही नरसिम्हा राव यांच्या सरकारमध्ये कॅप्टन सतीश शर्मा यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय देण्यात आलं होतं.

 

 

११ ऑक्टोबर १९४७ रोजी आंध्रप्रदेशमधील सिकंदराबादमध्ये कॅप्टन सतीश शर्मा यांचा जन्म झाला होता. राजकारणात येण्याआधी शर्मा हे व्यवसायिक वैमानिक होते. राजीव गांधींमुळे ते राजकारणात आले. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ मध्ये शर्मा अमेठीमधून निवडून आले होते.

 

 

१९९८ ते २००४ दरम्यान शर्मा रायबरेलीमधून खासदार होते. नंतर सोनिया गांधींसाठी त्यांनी ती जागा रिक्त केली. यानंतर २००४ ते २०१६ दरम्यान राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचं नेतृत्व केलं. त्यांच्या निधनावर काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version