Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेस ताकदीनिशी उद्धव ठाकरेंसोबत — नाना पटोले

 

मुंबई : वृत्तसंस्था । “काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंसोबत पूर्ण ताकदीनिशी आहे. काँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे”, असे स्पष्टीकरण आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले

 

आघाडीत बिघाडी असल्याचं चित्र सध्या राज्यात दिसू लागलं असून महाविकास आघाडीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा कलगीतुरा गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी त्याला वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलताना परखड शब्दांत सुनावलं. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी आधी गोंधळातून बाहेर या, मग स्वबळाचा निर्णय घ्या, असा खोचक सल्ला दिला. त्यानंतर राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये फूट पडून काँग्रेस बाहेर पडणार का? अशी चर्चा सुरू झालेली असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

 

“आधीचं सरकार ५ वर्ष चाललं, पण त्यावेळी देखील ते प्रत्येक ठिकाणी स्वबळावर चालले. तरी ते सरकार चाललंच. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हे सरकार निर्माण करताना एकच भूमिका मांडली होती की, भाजपला थांबविण्यासाठी या सरकारमध्ये सामील झालो आहोत. त्यामुळे आम्ही पर्मनंट आहोत असा उल्लेख त्यावेळी कुठेही केला नव्हता. काल उद्धव ठाकरे जे बोलले, ते शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून बोलले आहेत. मुख्यमंत्री म्हणून बोलले नाहीत. त्यांची एक ठाकरे शैली आहे, भाषा आहे. मी त्या दोघांची (भाजपा आणि शिवसेना) भाषा निवडणुकीच्या वेळी ऐकली आहे कोणत्या पातळीवर गेली होती. त्यामुळे आज आम्ही म्हणतोय की, त्यांचा नेमका इशारा कोणाकडे आहे ते कळले पाहिजे”, असं देखील नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 

संजय राऊतांनी काँग्रेसला आधी पक्षांतर्गत गोंधळातून बाहेर येण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यावर देखील नाना पटोले यांनी टोमणा मारला आहे.”काल टिळक भवनामध्ये आमच्या नेत्यांच्या भाषणातूनही जर कुणी बोध घेत नसतील, तर आमचा नाईलाज आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे आता स्वबळाच्या मुद्यावरून महाविकासआघाडीचं गणित बिघडतंय की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

 

स्वबळाच्या मुद्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी ही आमची भूमिका नाही असं मत मांडल्याबद्दल पत्रकारांनी विचारलं असता प्रभारींनी तशी भूमिका मांडलीच नसल्याचं नाना पटोले म्हणाले. “विधानभा निवडणुका किंवा लोकसभा निवडणुकांविषयी दिल्लीत निर्णय होतात असं प्रभारी म्हणाले आहेत. पण काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. काँग्रेस लढणार आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात होत आहे. काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेस स्वबळावर लढेल”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. मात्र, यावेळी काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत पूर्ण ताकदीनिशी आहे असंही ते म्हणाले .

 

Exit mobile version