Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेसमधूनही वनमंत्रीपदासाठी लॉबिंग ?

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता वनमंत्री पदावरुन जोरदार लॉबिंग सुरु आहे. वनमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून 4 नावं समोर येत असतानाच काँग्रेसनंही वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरु केल्याचं कळतंय.

 

वनमंत्रीपद आपल्याकडे घेऊन मदत आणि पुनर्वसन खातं शिवसेनेला सोडण्याची तयारी काँग्रेसची आहे. विजय वडेट्टीवार यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं देण्याचा काँग्रेसचा मानस असल्याचं कळतंय.

 

खातेवाटपावेळी विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण काँग्रेस नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर वडेट्टीवार यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमधील पहिली विकेट पडल्यानंतर काँग्रेसनं वनमंत्रीपदाची मागणी केल्याचं कळतंय. आता वनविभागाची जबाबदारी कुणाकडे सोपवली जाणार? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचवेळी वनखातं काँग्रेसला देऊन मदत आणि पुनर्वसन खातं शिवसेनेला देण्याची तयारी काँग्रेसची आहे.

 

शिवसेनेकडून वनमंत्रीपदासाठी 4 नावं समोर आली आहेत. रविंद्र वायकर, नीलम गोऱ्हे, गोपीकिशन बजोरिया आणि आशिष जैस्वाल यांचं नावं चर्चेत आहे. शिवसेनेकडून वनमंत्रीपद विदर्भाला म्हणजे संजय राठोड यांना देण्यात आलं होतं. पण आता राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर विदर्भात शिवसेनेचा एकही मंत्री नाही, असं व्हायला नको. त्यामुळे शिवसेनेकडून आशिष जैस्वाल यांना वनमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

“मी माझा राजीनामा  मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. आमच्या बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला. मात्र अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी प्रसारमाध्यम, समाज माध्यमातून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मीडियातून माझ्या समाजाची, माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रकार घडला. गेली तीस वर्ष मी केलेलं राजकीय आणि सामाजिक काम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे. याचा तपास व्हावा, मी बाजूला राहून चौकशी व्हावी, सत्य बाहेर यावं, ही माझी भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना हे सांगून मी राजीनामा दिला” अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी राजीनाम्यानंतर दिली.

Exit mobile version