Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेसची आज महत्वाची बैठक

पाटणा: वृत्तसंस्था । काँग्रेस पक्षाचा राजकीय उत्तराधिकारी निवडताना पुत्रमोहाचा त्याग करावा असा सल्ला बिहारमधली विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी सोनिया गांधी यांना दिला. बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीत काँग्रेस पक्ष देखील एक घटक पक्ष आहे.

काँग्रेस पक्षाची आज बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय होईल हे माहीत नाही, मात्र काँग्रेसची स्थिती नावाडी नसलेल्या नावेसारखी झाली आहे, कोणीच त्याचा वाली उरलेला नाही, असे तिवारी म्हणाले. राहुल गांधी यांच्यामध्ये लोकांना उत्साहित करण्याची क्षमता नाही हे स्पष्ट झालेले आहे. जनतेची गोष्ट तर सोडूनच द्या, पण त्यांच्याच पक्षातील लोकांचाच त्यांच्यावर विश्वास नाही. याच कारणामुळे लोक काँग्रेसपासून दूर जात आहेत.

तिवारी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, ‘आरोग्य ठीक नसतानाही सोनिया गांधी यांनी अध्यक्ष म्हणून पक्ष चालवत आहेत. मी त्यांचा आदर करतो. मला आठवते की सीताराम केसरी यांच्या काळात पक्ष रसातळाला जात असताना त्यांनी काँग्रेसची जबाबदारी सांभाळली आणि पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचविले, मात्र त्या विदेशी असण्यावरून बराच वाद झाला.’

‘आज सोनिया गांधी यांच्यापुढे यक्ष प्रश्न आहे की पक्ष की मुलगा किंवा असे म्हणू शकतो की पुत्र की लोकशाही. काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक होत आहे. माझे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचेल की नाही हे मला माहीत नाही, मात्र देशापुढे आज ज्या प्रकारचे संकट दिसत आहे, तेच मला माझे म्हणणे पुढे मांडण्यासाठी हतबल करत आहे.’ असेही ते म्हणाले

Exit mobile version