Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेसचं आता राज्यभर ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियान

 

ठाणे: वृत्तसंस्था । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस उद्यापासून राज्यभर ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे अभियान राबवणार आहे.

 

पुण्यातील टिळक वाड्यापासून या अभियानाची सुरुवात होणार असून 15 ऑगस्टपर्यंत आणि वर्षभर हे अभियान राबवलं जाणार आहे.

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली. या अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचा सहभाग आणि स्वातंत्र्योत्तर काळात देश उभारणीत असलेले काँग्रेसचे योगदान नव्या पिढीसमोर मांडले जाणार आहे, अशी माहिती पटोले यांनी दिली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली विविध माध्यमातून ब्रिटीश सरकारला जेरीस आणले. या संघर्षात हजारो लोकांनी बलिदान दिले, अनेकांना इंग्रज शासनाचे अनन्वीत जुलुम, अत्याचार सहन करावे लागले, लाठ्या काठ्या अंगावर घेतल्या, हजारोंना तुरुंगात डांबले गेले पण स्वातंत्र्यासाठी कुठलीही तडजोड केली नाही. स्वातंत्र्यानंतरही देश उभारणीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने भरीव कामगिरी केली म्हणूनच जगात देश आज ताठ मानने उभा आहे परंतु काही लोक काँग्रेस, गांधी, नेहरु कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवरून टीका करत आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचा सहभाग आणि स्वातंत्र्योत्तर काळात देश उभारणीत असलेले काँग्रेसचे योगदान नाकारता येणार नाही, असंही त्यांना सांगितलं.

 

या अभियानाची सुरुवात करताना पुण्यातील काँग्रेसच्या जुन्या घराण्यांच्या वारसांना बोलावले जाणार आहे. राज्यातील 15 हजारांपेक्षा जास्त स्वातंत्र्यसैनिकांचा त्यांच्या भागात गौरव केला जाणार आहे. स्वातंत्र्य चळवळीत फैजपूरचे अधिवेशन, आष्टी चिमूरचा लढा, नंदुरबारच्या शिरीषकुमारचे बलिदान, गवालिया टँक अशा महत्वाच्या, ऐतिहासिक ठिकाणी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे.

 

पहिल्या टप्यात 1 तारखेला पुण्यात कार्यक्रम होईल त्यानंतर 7 ऑगस्टला सकाळी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे हुतात्म्यांना व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करुन स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला जाणार आहे.  स्वातंत्र्यचळवळीत चिमठाणा ( जिल्हा धुळे ) येथे ब्रिटिशांचा खजिना लुटला होता त्या जंगलात दुपारी 4 वाजता कार्यक्रम होणार आहे, मशाल मोर्चा काढला जाईल. शिरिषकुमार मेहता या 14 वर्षांच्या तरुणाने स्वातंत्र्यासाठी इंग्रजांचा गोळ्या झेलल्या त्याच्या स्मरणार्थ नंदुरबार येथे 8 ऑगस्टला सकाळी एक कार्यक्रम होईल. त्यानंतर नाशिक येथे दुपारी 4 वाजता थोर क्रांतीकारक अनंत कान्हेरे यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होईल आणि 9 ऑगस्टला मुंबईतील गवालिया टँक येथे एक कार्यक्रम होत आहे. या अभियानासाठी प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड व विनायक देशमुख यांच्याकडे समन्वयकाची जबाबदारी आहे तर उत्तर महाराष्ट्रातील कार्यक्रमासाठी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी पुढाकार घेतला आहे.

 

Exit mobile version