Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार जाहीर

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | संयुक्त महाराष्ट्राचे झुंजार सेनापती, साहित्य सम्राट, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीदिनी आचार्य अत्रे मानचिन्हाचा पुरस्कार यावर्षी प्रख्यात कवी ना. धो. महानोर यांना प्रदान केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा समारंभ खानदेशच्या मातीत जळगाव येथे १३ ऑगस्ट रोजी कस्तुरबा सभागृह, गांधी तीर्थ, जळगाव येथे सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार आहे.

आचार्य अत्रे यांचे निधन १३ जून १९६९ रोजी झाले. त्यानंतर १९७१ पासून २०२१ पर्यंत ‘साहित्यसम्राट आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार’ प्रदान करण्याचे कार्यक्रम मुंबईत आणि पुण्यात झाले. दि. १३ ऑगस्ट रोजी जळगावात होणारा हा पुरस्कार प्रदान समारंभ पहिल्याप्रथम खानदेशात होत आहे. आचार्य अत्रे यांचे खानदेशच्या मातीशी घनिष्ठ संबंध होते. प्रख्यात कवी बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचे महाराष्ट्रभर कौतुक करण्याचे काम पहिल्याप्रथम आचार्य अत्रे यांनी केले.

दैनिक मराठातून बहिणाबाईंच्या कवितांवरचा गाजलेला अग्रलेख आजही महाराष्ट्रात चर्चेत असतो. सोपानदेव चौधरी आचार्य अत्रे यांचे खास मित्र होते. याखेरिज आचार्य अत्रे यांच्या द्वितीय कन्या मिनाताई देशपांडे यांचा विवाह धुळे येथील प्रा. सुधाकर देशपांडे यांच्याशी झाल्यामुळे अत्रे कुटुंबीयांचा खानदेशची जवळचा संबंध आहे.

या वर्षीचा पुरस्कार कवीश्रेष्ठ ना. धों. महानोर यांना ‘आत्रेय’ तर्फे अॅड. राजेंद्र पै यांनी जाहीर केला. ते आचार्य अत्रे यांचे नातू आहेत. हा कार्यक्रम मुंबईत न करता जळगाव येथेच करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. आमदार शिरीष मधुकरराव चौधरी हे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खानदेशमध्ये होणाऱ्या आचार्य अत्रे जयंती समारंभाला उपस्थित राहावे, अशी विनंती अॅड. राजेंद्र पै यांनी केली आहे.

या समारंभाला स्व. सुधाकर देशपांडे यांचे सुपुत्र अमेरिकेत असणारे अॅड. हर्षवर्धन देशपांडे हेसुद्धा उपस्थित राहून खानदेशच्या भूमिला अभिवादन करायला येणार आहेत.

Exit mobile version