Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कत्तलीसाठी नेणाऱ्या सात गुरांची सुटका !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोळवद गावाजवळील खडकाई नदीच्या पात्राजवळून बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या दोघांवर यावल पोलीसांनी कारवाई करत ताब्यात घेतले. तर ७ गुरांची सुटका करण्यात येवून त्यांना गोशाळेत रवाना करण्यात आले. याबाबत यावल पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील कोळवद गावाच्या नजीक असलेल्या खडकाई नदीच्या पात्राजवळू २ जण गुरांना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचारी पोलीस हेडकॉन्स्टेबल बालक बाऱ्हे, भूषण चव्हाण, अनिल साळुंखे आणि गणेश ढाकणे यांनी गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता धडक कारवाई केली. यात गुरे घेऊन जाणाऱ्या संशयित आरोपी शराफत अली आशिक अली (वय-५३) आणि शोएब शराफत अली (वय-१८) दोन्ही रा. मारूळ ता. यावल हे दोघे सात गुरे घेऊन जात होते. याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ही गुरे जाकीर कुरेशी आणि इब्राहिम कुरेशी दोन्ही रा. यावल यांच्या मालकीचे असून यावल शहरात कत्तलसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. यावल पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले असून गुरांची सुटका करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल गणेश ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शराफत अली आशिक अली, शोएब अली शराफत अली दोन्ही रा. मारूळ ता. यावल, जाकीर कुरेशी आणि इब्राहिम कुरेशी दोन्ही रा. यावल यांच्या विरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. गुरांना यावलचे पशु चिकीत्सक डॉ .आर .सी भगुरे यांनी उपचार करून या सर्व गुरांना निमगाव येथे गोशाळेत रवाना करण्यात आले आहे.

Exit mobile version