Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कंगनावर आता पटकथा चोरीचा आरोप

मुंबई : वृत्तसंस्था । कंगनावर तिसऱ्यांदा चोरीचा आरोप करण्यात आला आहे. . Didda: The Warrior Queen Of Kashmir या पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी कंगनावर पटकथा चोरल्याचा आरोप केला आहे

अभिनेत्री कंगना रणौतने मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. विशेष म्हणजे दिग्दर्शकीय क्षेत्रातील तिचा हा पहिला प्रयत्न यशस्वीदेखील ठरला. मात्र, या चित्रपटाच्या यशाबरोबरच मध्यंतरी काही वाददेखील रंगल्याचं पाहायला मिळालं. कंगनावर अनेकांनी आरोप-प्रत्यारोप केले. यामध्येच आता कंगनावर पुन्हा एक नवा आरोप करण्यात आला आहे.

 

काही दिवसांपूर्वीच कंगनाने ‘मणिकर्णिका रिटर्न्स : द लिजेंड ऑफ दिद्दा’ या सिक्वलची घोषणा केली आहे. हा चित्रपट काश्मीरमधील राणी दिद्दा यांच्या जीवनावर आधारित आहे. कंगनाने या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर आशिष कौल यांनी कंगनावर ‘दिद्दा : द वॉरियर क्विन ऑफ काश्मीर’ या पुस्तकातून ही कथा घेतल्याचा आरोप केला आहे. तसंच त्यांनी कंगनाला कायदेशीर नोटीसदेखील पाठवली आहे.

“मी ज्या महिलेला राष्ट्रवादी समजत होतो, तिनेच माझी फसवणूक केली आहे. मी एक काश्मिरी ब्राह्मण आहे. मध्यंतरी कंगनाने ज्या प्रकारे काश्मिरी ब्राह्मणांचा मुद्दा उचलून धरला होता त्यावरुन तिला आमचं दु:ख समजत असेल असं वाटत होतो. त्यामुळे काश्मिरी लोकदेखील तिला आदर देत होते. मात्र, ज्या पद्धतीने तिने माझी कथा चोरली आहे आणि मला खोट ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. हे पाहून आम्ही चुकीच्या माणसाला आमचा हिरो समजत होतो असं वाटतंय”, असं आशिष कौल म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “दिद्दाची कथा माझ्या कुटुंबाकडून मला वारसात मिळाली आहे. ही गोष्ट माझ्या आजीने मला सांगितली होती. त्यानंतर अनेक वर्ष मी या कथेवर मेहनत घेतली आणि हे पुस्तक लिहिलं. इतकंच नाही तर फिल्म रायटर्स असोसिएशन आणि दिल्लीत जाऊन त्याचे कॉपी राइट्सदेखील घेतले. मात्र, आता कंगना आणि चित्रपट निर्माते कमल जैन मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत”.

दरम्यान, आशिष कौल यांनी कंगनाला कायदेशील नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी निर्माते, दिग्दर्शक केतन मेहता यांनीदेखील कंगनावर चोरीचा आरोप केला होता. ‘मणिकर्णिका’ चित्रपटाची संकल्पना कंगनाने चोरल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसंच ‘सिमरन’ चित्रपटाचे लेखक अपूर्व असरानी यांनीही कंगनावर जबरदस्तीने पटकथा घेतल्याचा आरोप केला होता

 

Exit mobile version