औरंगाबादेत तालुकाध्यक्षाची हॉस्पिटलच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

औरंगाबाद वृत्तसंस्था । घाटी रूग्णालयातील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन एका करोना रूग्णाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (२७ सप्टेंबर) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. काकासाहेब श्रीधर कणसे (४२, रा. धनगाव, पैठण) असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे.

कणसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, तसेच पंचायत समिती सदस्यही होते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी आमदार संजय वाघचौरे यांनी केली. या प्रकरणात घाटी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काकासाहेब श्रीधर कणसे यांचा २१ सप्टेंबरला करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने २४ सप्टेंबरला दुपारी चार वाजेच्या दरम्यान अतिदक्षता विभागाच्या वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांनी शौचालयाला जायचे असल्याचे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सांगितले होते. व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णाला शौचालयात नेण्यात परवानगी नसल्याने, त्यांना पॉट देण्यात आले. त्यानंतर कर्मचारी बाहेर थांबले होते. काकासाहेब कणसे यांनी कोणालाही न सांगता, त्याच्या बेडजवळ असलेल्या खिडकीतून खाली उडी मारली, अशी माहिती सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर जाधव यांनी दिली. या घटनेची नोंद बेगमपूरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Protected Content