Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

औरंगजेबाची कबर काढून टाका : शिवसेनेच्या नेत्यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुगल बादशहा औरंगजेब याची कबर काढून टाकण्याची मागणी शिवसेनेच्या दोन नेत्यांनी केली असून ते या संदर्भात पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहणार आहे.

 

सध्या औरंगाबादच्या नामांतरामुळे वाद पेटला आहे. एमआयएमने नामांतराच्या विरोधात खासदार इम्तीयाज जलील यांच्या अध्यक्षतेखाली कालपासून उपोषण सुरू केले आहे. याला भाजप आणि शिवसेनेने विरोध केला आहे. आज आमदार संजय शिरसाठ आणि माजी आमदार प्रदीप जैसवाल यांनी तर या प्रकरणी पुन्हा वादंग निर्माण केले आहे.

 

आज आमदार संजय शिरसाट म्हणाले की, जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याने याचा सर्वात जास्त दु:ख हैदराबादींना झाले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाविरोधात लढा दिला. त्यामुळे जिल्ह्याचे नाव बदलणे म्हणजे अत्याचारी औरंगजेबाविरोधातील हा लढा आहे. शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर होणे आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. काही जणांना याचे वाईट का वाटत आहे? तुम्ही काय औरंगजेबाचे वंशज आहात का ? आम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीचे अवशेषही नको. त्यामुळे खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर काढून टाकावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहोत.

 

दरम्यान, शिवसेनेचेच नेते तथा माजी आमदार प्रदीप जैस्वाल म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या आंदोलनात औरंगजेबाची पोस्टर झळकावले जात आहे. त्यामुळे भविष्यात कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. असे काही झाल्यास आम्ही बाळासाहेबांनी शिकवल्याप्रमाणे शिवसेना स्टाईल जशास तसे उत्तर देऊ.

Exit mobile version