Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

औट्रम घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद

 

चाळीसगाव, प्रतिनिधी कन्नड घाट म्हणून ओळख असलेल्या औट्रम घाटाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असल्याने खासदार उन्मेष पाटील यांनी एक दिवस घाट बंद करून रस्त्यांचे काम करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याने आज घाट बंद ठेऊन दुरुस्ती करण्यात आली.  

कन्नड घाटाची दुरूस्ती आज हाती घेण्यात आल्याने नांदगाव मार्गाने येणाऱ्या वाहनांना वाहतूक शाखेच्या वतीने अडवण्यात आले होते.  राष्ट्रीय हायवे क्रमांक- २११ वरील कन्नड घाटाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता हि विदारक चित्र सध्या आहे. घाटाच्या या दुरवस्थामुळे अनेक अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या गोष्टीची दखल घेत जळगाव मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी दि. ८ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत घाट बंद करून रस्त्यांचे काम करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आज घाट बंद करण्यात आली आहे. दरम्यान नांदगाव मार्गाने येणाऱ्या गाड्या ह्या जास्त असल्याने वाहतूक शाखेकडून त्यांना अडवून घाट बंद असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलीस अंमलदार अरूण बाविस्कर, आबा पाटील, गणेश चव्हाण, दिपक पाटील व नरेंद्र पाटील उपस्थित होते.

 

Exit mobile version